
रोहिग्यांना त्यांच्या मायदेशी परतावेच लागणार, हिंदुस्थानमध्ये त्यांना जास्त वेळ थारा देता येणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. बुधवारी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्या बोलाताना मोदींनी ही बाब स्पष्ट केली. तसेच रोहिग्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी हिंदुस्थानने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहिग्यांना हिंदुस्थानमध्ये फार काळ राहता येणार नाही. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 120 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांना म्यानमारमध्ये परतावेच लागेल असे मोदी म्हणाले. तसेच रोहिंग्या प्रश्नी बांग्लादेश सरकारने जी पावले उचलली त्याबद्दल मोदींनी पंतप्रधान शेख हसीना यांचे अभिनंदन केले.
शेख हसीना यांनी भेटीदरम्यान एनआरसीचाही मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मोदी म्हणाले की संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने आखालेल्या नियमांनुसार होत आहे. तसेच न्यायालयाच्या निगराणीखालीच ही प्रक्रिया सुरू असल्याचे मोदी म्हणाले.
देशात शांतता टिकावी म्हणून शेख हसीना यांनी दहशतवादाविरोधात जे प्रयत्न केले त्याचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. गेल्या पाच वर्षात हिंदुस्थान आणि बांग्लादेशचे संबंध अजून मजबूत झाल्याचे हसीना यांनी सांगितले तसेच सागरी सुरक्षा, अणुऊर्जा आणि व्यापारी क्षेत्रात दोन्ही देशांनी मिळून चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.



























































