
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण झाले नाही. पण पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत लांबलचक भाषण दिले. चीनची घुसखोरी आणि माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावर पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण राज्यसभेतील ९७ मिनिटांच्या लांबलचक भाषणात पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत. संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेले मोदींचे भाषण संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी संपले.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीचा मुद्दा आणि माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला घेरले आहे. विरोधकांनी गेल्या ४ दिवसांपासून संसदेत हा मुद्दा उचलून धरला आहे. यामुळे पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणा दिल्या. एलओपी को बोलने दो…, तानाशाही नहीं चेलेगी…, विपक्ष की आवाज नही दबेगी…, एलओपीका आपमान नही सहेंगे… अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. या गदारोळात मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. मोदींनी राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत १ तास ३७ मिनिटे एवढे लांबलचक भाषण केले.
कलम ३७०, ईशान्य हिंदुस्थानात शांतता आणली, ऑपरेशन सिंदूर, नक्षलवाद विरोधी कारवाई, सिंधू जल कराराचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. मोदी तेरी कब्र खुदेगी…, अशा घोषणा काँग्रेस देत आहे ते त्यांच्या मनात असलेल्या द्वेषातून, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. पंतप्रधान मोदींनी गरिबी निर्मूलन, फाटक नसलेले रेल्वे क्रॉसिंग बंद केले, गावागावांत वीजपुरवठा केला, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. सैन्याकडे दारूगोळा नाहीये, जवानांना बुलेटप्रुफ जॅकेट नाहीये, हिमवृष्टीचा सामना करण्यासाठी बुटं नाहीत, अशा बातम्या काँग्रेसच्या काळात येत होत्या. आम्ही देशाच्या जवानांसाठी तिजोरी खुली केली. जवानांना जे पाहिजे ते देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण २०२० मधील चीनची घुसखोरी आणि त्या भीषण घटनेवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत. आणि नेहमी प्रमाणे रटाळ भाषण सुरू ठेवले.



























































