
‘आजपासून 190 वर्षांपूर्वी लॉर्ड मेकॉले नावाच्या इंग्रजाने हिंदुस्थानात मानसिक गुलामीचा पाया रचला. हिंदुस्थानची मूळ ओळख पुसून टाकण्याच्या कुटील हेतूने बीजे पेरली. त्या अपवित्र घटनेला 2035 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या गुलामीतून आता बाहेर पडावे लागेल. पुढच्या दहा वर्षांत हिंदुस्थानला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त व्हावे लागेल. तसा संकल्प प्रत्येकाने करायला हवा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
अयोध्येतील राम मंदिरावरील ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. ‘आपण आपल्या मूळ ओळखीपासून दूर गेलो की आपले वैभव इतिहासाच्या पानांत लुप्त होते. मेकॉलेने हेच हेरून मुळावर घाव घातला. त्याचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळूनही हीन भावनेपासून आपली सुटका झाली नाही. विदेशातील प्रत्येक गोष्ट चांगली आणि आपल्या प्रत्येक गोष्टीत खोट हीच आपली मानसिकता बनली. लोकशाही विदेशातून घेतली, आपले संविधान विदेशी विचारांनी प्रेरित आहे हे याच मानसिकतेने अधोरेखित केले, मात्र सत्य वेगळे आहे. हिंदुस्थान ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे,’ असे मोदी म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही यावेळी उपस्थित होते.
शतकानुशतकांच्या जखमा भरल्या जात आहेत!
‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. संपूर्ण देश व जग राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात अपार आनंद आहे. शतकानुशतकांच्या जखमा भरल्या जात आहेत. शतकानुशतके वेदना कमी होत आहेत. शतकांचा संकल्प पूर्ण होत आहे,’ असे मोदी म्हणाले. 2047 साली देश स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे, तोपर्यंत हिंदुस्थानला विकसित बनविण्याचे आपले लक्ष्य आहे. त्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य लागेल. प्रत्येकाला आपल्यातील राम जागवावा लागेल,’ असे मोदी म्हणाले.
दलित असल्यामुळे मला बोलावले नाही – अवधेश प्रसाद
राम मंदिरात झालेल्या ध्वजारोहण सोहळय़ाचे आमंत्रण अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. ‘एक्स’वर पोस्ट करून त्यांनी राम मंदिर न्यासावर गंभीर आरोप केला. ‘मी दलित समाजाचा असल्यामुळे मला कार्यक्रमाला बोलावले नाही. हा रामाचा विचार नाही. श्रीराम सगळय़ांचे आहेत. त्यांनी कधी भेदभाव केला नाही, मात्र काही लोक रामावर फक्त त्यांचाच अधिकार आहे असे मानतात. त्यांच्याच संकुचित विचारांमुळे मला आमंत्रण दिलेले नाही. माझा संघर्ष एखादे आमंत्रण किंवा एखाद्या पदासाठी नाही. सन्मान, बरोबरी आणि संविधानाच्या मूल्यांसाठी आहे, असे अवधेश प्रसाद म्हणाले.

























































