बुद्ध आणि गांधीच्या देशात आता प्रत्येक व्यवस्था ‘परमनन्ट’ होणार : नरेंद्र मोदी

1097

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. या वेळी मोदी यांनी कश्मीर समस्या आणि कलम 370 बाबत उपस्थितांना सांगितले. गौतम बौद्ध आणि महात्मा गांधीच्या देशात आता कोणत्याही अस्थायी गोष्टींना स्थान नाही. या देशात आता प्रत्येक गोष्ट ‘परमनन्ट’ होणार आहे, असे मोदी म्हणाले. या समस्येबाबत मोदी यांनी सूचक शब्दांत आपले मत नोंदवले.

हिंदुस्थानमध्ये आता कोणतीही टेम्पररी व्यवस्था अस्तित्वात येणार नाही. आता प्रत्येक व्यवस्था ठोस आणि परमनन्ट करण्यात येईल असे मोदी यांनी स्पष्ट केले. देशातील एक तात्पुरती व्यवस्था हटवण्यासाठी 70 वर्षांचा कालावधी लागला, हे देशातील 125 कोटी जनतेने अनुभवले आहे. त्यामुळे आता आम्ही प्रत्येक व्यवस्था ठोस, परमनन्ट आणि पारदर्शक करणार आहोत, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. परिवर्तन, व्यवस्थेत सुधारणा, ठोस निर्णय आणि परमनन्ट व्यवस्था या गोष्टींमुळे देश विकास करत आहे. संविधानात जम्मू कश्मीरसाठी कलम 370 तात्पुरत्या स्वरुपात होते. मात्र, ही व्यवस्था हटवण्यासाठी 70 वर्षे निघून गेली. आता यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

जम्मू कश्मीरमधून 5 ऑगस्टला कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पहिल्यांदाच या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या 70 वर्षांपासून हे कलम हटवण्यासाठी जनता मागणी करत होती. मात्र, आधीच्या कोणत्याही सरकारने हे कलम रद्द करण्याचे धाडस केले नाही. मोदी सरकारने हा धाडसी निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानची प्रतिमा उंचावली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशियासह अनेक देशांना हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या