
डॉ. जयंत नारळीकर यांनी चार दशकांहून अधिक काळ खगोलभौतिकी क्षेत्रात अविरत संशोधन केले. त्याच जोडीला विज्ञानविषयक लेख आणि मराठी पुस्तके लिहिणे सुरूच ठेवले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले.
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्पृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर 1957 साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील पेंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
1966 साली नारळीकर यांचा विवाह मंगला राजवाडे यांच्याशी झाला. प्रसिद्ध गणितज्ञ असलेल्या मंगला यांचे दोन वर्षांपूवी निधन झाले. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन मुली आहेत. ब्रिटनमधून 1972 साली हिंदुस्थानात परतल्यानंतर जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 1988 साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
आयुका आणि डॉ. नारळीकर… एक समीकरण
डॉ. नारळीकर यांनी 1988 साली पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना केली. ‘आयुका’चे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. ते 1988 ते 2003 या काळात ‘आयुका’ चे संचालक होते. ‘आयुका’ आणि डॉ. नारळीकर हे जणू समीकरण बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खगोलशास्त्रज्ञ, खगोलभौतिकी, सैद्धांतिक भौतिकी या विषयावर विविध संशोधन झाले. संस्थेच्या स्थापनेपासून संशोधन, प्रशिक्षण, विज्ञान प्रसार यासाठी त्यांनी दर्जेदार कार्यक्रम सुरू केले. विज्ञान जागर, नॅशनल स्काय वॉचिंग प्रोग्रॅम्स यासारख्या उपक्रमांद्वारे सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोचवले. ‘आयुका’ ही आज हिंदुस्थानी खगोलशास्त्राची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते.
बिग बँग थिअरी नाकारली
डॉ. जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. त्यांचे पीएच.डी.चे गाईड डॉ. फ्रेड हॉईल यांच्या साथीने त्यांनी ‘स्थिर स्थिती सिद्धांता’वर (स्टेडी स्टेट का@स्मोलॉजी) संशोधन केले व जगप्रसिद्ध ‘बिंग बँग’ (महास्पह्ट) सिद्धांताला आव्हान देणारा नवा सिद्धांत तयार केला.
आजवर मिळालेले पुरावे महास्पह्टाच्या सिद्धांताला पूरक आहेत. dत्या तुलनेने स्थिर विश्वाच्या सिद्धांताबद्दल कमी पुरावे मिळाले आहेत, यासंबंधी एका मुलाखतीत उत्तर देताना जयंत नारळीकर म्हणाले, नवीन संशोधन स्वीकारताना वैचारिक खुलेपणा स्वीकारायला हवा. 100 वर्षांपूर्वीचे भौतिकशास्त्रातील सिद्धांत आणि आजचे सिद्धांत यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. विश्वाबद्दल अजून आपल्याला खूप कमी माहिती आहे. कोणताही सिद्धांत नाकारणे सहज शक्य नाही. मात्र त्यांच्या समर्थनार्थ खूप पुरावे गोळा करावे लागतील.
स्थिर स्थिती सिद्धांतामध्ये महास्पह्ट (बिग बँग) सिद्धांतासारख्या काल्पनिक मिथकांना स्थान नाही आणि या विश्वातील सर्व पदार्थ-वस्तुमान एका क्षणात या विश्वात ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत डावलून येणे ही शक्यता वाटत नाही. त्या जागी तेथे सातत्यपूर्ण वस्तुमानाच्या निर्मितीबरोबर विश्वाचा स्थिर विस्तारसुद्धा आहे, असे नारळीकर यांनी एका मुलाखतीत आपला मुद्दा पटवून देताना म्हटले होते. याव्यतिरिक्त क्वांटम गुरुत्वाकर्षण, पॅन्सर्मिया सिद्धांत यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.
आकाशाशी जडले नाते… विपुल साहित्य संपदा
डॉ. जयंत नारळीकर हे लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली. 2021 साली नाशिक येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
‘अंतराळातील भस्मासुर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘सूर्याचा प्रकोप’, ‘अभयारण्य’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘प्रेषित’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘गणितातील गमतीजमती’, ‘नभात हसरे तारे’ (सहलेखक ः डॉ. अजित पेंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’, ‘विश्वाची रचना’, ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’, ‘विज्ञानगंगेची अवखळ वळणे’, ‘विज्ञानाची गरुडझेप’, ‘विज्ञानाचे रचयिते’ ही त्यांची काही गाजलेली विज्ञानवादी पुस्तके लिहून सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
भावी पिढय़ांसाठी अमूल्य संशोधन – पंतप्रधान नरेंद्र मोदी
डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन हे वैज्ञानिक समुदायाचे प्रचंड नुकसान आहे. डॉ. नारळीकर खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संशोधनातील अग्रगण्य कार्य, महत्त्वपूर्ण सैद्धांतिक चौकटी, संशोधकांच्या भावी पिढय़ांसाठी अमूल्य ठरतील. एक संस्थापक म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक शैक्षणिक आणि उपक्रम पेंद्रांची उभारणी करून त्यांनी युवा मनांना घडविले. सामान्य नागरिकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांच्या लेखनानेही मोलाचे योगदान दिले आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
खगोलशास्त्राचा अध्वर्यु निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदुस्थानची विज्ञानाधिष्ठाrत प्रतिमा उजळवणारा आणि खगोलशास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी खगोलशास्त्राचा अध्वर्यु निमाला. गणितज्ञ वडिलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. मायदेशी परतल्यावर त्यांना ‘आयुका’ या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी पार पाडली. ‘बिग-बँग थिअरी’ला पर्यायी संकल्पनाही त्यांनी मांडली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या का@स्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्यदेखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिकदृष्टय़ा अजरामर अशीच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
तमाम विज्ञानप्रेमींचे नुकसान – अरविंद परांजपे
प्राध्यापक जयंत नारळीकर आता आपल्यात नाहीत ही बाब मला खूप अस्वस्थ करणारी आहे. माझा त्यांच्याशी खूप जुना संबंध होता – पंधरा वर्षांहून अधिक काळ. मी 1991 ते 2011 पर्यंत इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) मध्ये काम केले. प्रोफेसर नारळीकर हे त्याचे संस्थापक संचालक होते. ती 22 वर्षे त्यांच्याकडून सतत प्रोत्साहनाने भरलेली होती, परंतु जेव्हा त्यांना वाटले की मी योग्य दिशेने जात नाही, तेव्हा त्यांनी मला योग्यरीत्या फटकारले. जरी असे फारसे प्रसंग नव्हते तरी त्या आठवणी आहेत. त्यांनी मला पत्रकारांशी आणि जनतेशी (विद्यार्थी आणि सामान्य माणसाशी) संवाद साधण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन दिले. 2011 मध्ये त्यांनीच सुचवल्यामुळे मी मुंबईतील नेहरू तारांगणाच्या संचालक पदासाठी अर्ज केला होता. मी अनिच्छुक होतो. कारण मी आयुकात व्यवस्थित स्थिरावलो होतो. पुढे मी नेहरू तारांगणात सामील झाल्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करताना मला जे काही शिकायला मिळाले त्याचा मला खूप फायदा झाला. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने विज्ञानप्रेमींचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना वरळीच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी व्यक्त केल्या.
सोप्या शब्दांत विज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे संस्थापक असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान कथा, लघु निबंध व वृत्तपत्रातील लेखांच्या माध्यमातून विज्ञान विश्वातील नवनवीन घडामोडी व संशोधन जनसामान्यांसमोर आणले. कठीण वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजून सांगण्याची त्यांच्याकडे हातोटी होती, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मिळालेले पुरस्कार
खगोलविज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नारळीकर यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘महाराष्ट्र भूषण’ या सर्वोच्च सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.