तो शहिदांचा अपमान नव्हता का? बाटला हाऊस प्रकरणी मोदींची काँग्रेसवर टीका

pm-modi

सामना ऑनलाईन । पाटणा

बाटला हाऊस प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रु आले होते, तो शहिदांचा अपमान नव्हता का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. बिहार येथे अररिया इथल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

पंतप्रधान म्हणाले की, वोट बँकेचं राजकारण बाटला हाऊसवेळी झालं होतं. जेव्हा सैनिकांनी दहशतवाद्यांना ठार मारलं तेव्हा त्या कारवाईमुळे आनंदित न होता उलट दहशतवाद्यांसाठी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी अश्रु गाळले होते. तेव्हा तो शहिदांचा अपमान नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणावेळी केला. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी काँग्रेस सरकारने सैन्याला कोणतीही माहिती देण्यास नकार दिला होता. काँग्रेसने पाकिस्तानहून आलेल्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी हिंदूंना दहशतवादी हा शब्द जोडण्याचं कारस्थान केलं. योजनाबद्ध पद्घतीने तपासाची दिशाच बदलून टाकली.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही जाती-धर्माआधी आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपली ओळख हिंदुस्थानी अशी आहे. मी गेल्या पाच वर्षांमध्ये मातेची सेवा केल्याच्या भावनेनेच जनतेची सेवा केली आहे. आमच्या सरकारनेच दहशतवादाच्या विरोधात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला आणि नंतर एअर स्ट्राईक केला. त्याचा परिणाम म्हमून जो पाकिस्तान आधी शिरजोरी करायचा, तोच पाकिस्तान आता जगभरात जाऊन मदतीची याचना करताना दिसत आहे. जर हिंमत असेल तर पुलवामा शहिदांच्या बलिदानाचा आम्ही जो बदला घेतला, त्याची सामान्यांमध्ये जाऊन चर्चा करून दाखवा. मी आव्हान देतो की, तुम्ही ही चर्चा करूच शकणार नाही, असं आव्हानही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला दिलं.

आपली प्रतिक्रिया द्या