पीएमसी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने जूनपर्यंत वाढवले

718

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेले निर्बंधांची मुदत जून महिन्यापर्यंत वाढवले आहेत. 22 जूनपर्यंत हे निर्बंध राहणार असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे. पीएमसी बँकेला या संकटातून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत असल्याचे देखील बँकेकडून सांगण्यात आले आहे.

कोटय़वधी रुपयांच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणामुळे पंजाब अँड महाराष्ट्र को- ऑप. बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ‘पीएमसी’ बँकेवरील निर्बंधांमुळे खातेदारांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यावर घातलेल्या मर्यादेमुळे दैनंदिन व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. पीएमसी बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यावर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सुरुवातीला खातेदारांना 1000 रुपये काढण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर टप्याटप्याने 50 हजार रुपयांपर्यंत ही मर्यादा वाढविण्यात आली. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी खातेदारांत आजही भीतीचे वातावरण आहे. ‘पीएमसी’ बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत असल्याकडे शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘पीएमसी’ बँकेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील दिवाळखोरीत निघालेल्या ‘एचडीआयएल’ कंपनीला 6700 कोटी रुपयांचे कर्ज बनावट खात्यांमधून देण्यात आले.

32 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गेल्या महिन्यात 32 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ‘एचडीआयएल’ कंपनीच्या संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष करियम सिंग, माजी संचालक सुरजीतसिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या