पीएमसी बँक प्रकरण- ईडीकडून वाधवान बंधुंच्या फार्म हाऊसला टाळे

651


पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकरणात अडकलेले एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश व सारंग वाधवान यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास धोकवडे येथील इंद्र पै नगरातील फार्म हाऊसवर ईडीने शनिवारी छापा टाकला. ईडीने या कारवाईत वाधवान यांच्या फार्म हाऊसमध्ये बांधलेले दोन आलिशान बंगले सील केले आहेत. वाधवान यांनी हा फार्म हाऊस सीआरझेडचे उल्लंघन करून बांधलेला असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनही नोटीस दिलेली आहे. मात्र तूर्तास वाधवान यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवलेली आहे. मात्र ईडीच्या कारवाईनंतर नीरव मोदीप्रमाणे वाधवान यांचाही बंगला जमीनदोस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलिबाग तालुक्यात आवास ग्रामपंचायत हद्दीत इंद्र पै परिसरात राकेश व सारंग वाधवान यांचे फार्म हाऊस आहे. 95, 96, 97 सर्व्ह नंबरची ही मालमत्ता असून चार एकरात वाधवान यांनी आलिशान दोन बंगले बांधले असून 22 अद्ययावत खोल्या बांधल्या आहेत. या बंगल्याचा परिसर प्रशस्त असून समोरच विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे. बंगल्याच्या चारी बाजूला भिंतीचे काम करण्यात आलेले आहे. तर बंगल्याच्या खाली परिसरात एक नौका ठेवली आहे.

सक्तवसुली संचलनालय अधिकाऱ्यांनी वाधवान यांच्या फार्म हाऊसमधील दोन बंगल्यांवर नोटीस लावली आहे. बंगल्यात कोणासही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. स्थानिक 14 सुरक्षा रक्षक व 25 कर्मचारी सध्या बंगल्यात आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांवरही लवकरच घरी बसण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या अनियमिततामुळे आरबीआय बँकेने बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध आणले आहेत. त्यामुळे लाखो ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. मात्र असे असताना बँकेचे प्रवर्तक रमेश व सारंग वाधवान यांनी स्वतःची तुंबडी भरून करोडोची माया जमवून संपत्ती गोळा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या