कविता बोलू लागल्या…

पहिली ते दहावीच्या बालभारती पाठय़पुस्तकातील मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतील कवितांचं विविध प्रकारे रंगमंचावर सादरीकरण होणार आहे.

कवितांशी मैत्री करण्यासाठी…नाचत, हासत कवितेचं गाणं ऐकण्यासाठी…तिच्यातला नाच अनुभवण्यासाठी आपल्या बालभारतीच्या पाठय़पुस्तकातील कवितांचा आनंद आपणही घेऊ शकता. त्यासाठी या कवितांशी बट्टी घ्यायला तुम्हालाही आवडेल ना? यासाठीच ‘गंधार’ ही संस्था बालभारतीच्या पाठय़पुस्तकातील कवितांचा रंगमंचीय आविष्कार ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमांतर्गत सादर करणार आहे. शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिर येथे या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

पहिली ते दहावीच्या बालभारती पुस्तकातील मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातील कवितांचं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे. पंचवीस बालकलाकार यामध्ये सहभागी होणार असून ते वेगवेगळ्या प्रकारे आपली कला स्वतः सादर करणार आहेत. ज्येष्ठ कलाकार अशोक समेळ, उदय सबनीस, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभही यावेळी प्रेक्षक, विद्यार्थ्यांना घेता येईल.

शैक्षणिक उपक्रम आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ….
पाठय़पुस्तकातील कविता या फक्त अभ्यासापुरत्या मर्यादित नसतात. त्या खऱया अर्थाने जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱया असतात. कवितांमधून आनंद देणाऱया या कार्यक्रमात निवेदन, काव्यवाचन, गायन, वादन आणि अभिनयासह मुलेच या आपली कला स्वतः सादर करणार आहेत. मुलांनीच मुलांना पाठय़पुस्तकातील कविता सांगितल्या तर त्या इतर मुलांच्याही लवकर लक्षात येतील हा यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे हा व्यावसायिक कार्यक्रम नसून याचे प्रयोग तिकिट लावून केले तरीही यातून मिळणारा काही नफा शैक्षणिक उपक्रमासाठी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वापरला जाईल.

कवितांशी ‘कट्टी बट्टी’
जी मुलं आयुष्यभर पुस्तकांशी कट्टी करतात त्यांनी त्यांच्याशी बट्टी करावी आणि मैत्री करावी. सर्वसामान्यपणे शाळकरी मुलं पाठय़पुस्तकांकडे परीक्षा देणं आणि दप्तराचं ओझं किंवा परीक्षेसाठी मार्क मिळवून देणारी पुस्तकं यापलीकडे फारसं बघत नाहीत. अत्यंत परीश्रमपूर्वक तयार केलेली आणि संस्कारक्षम अशी ही पुस्तकं परीक्षेच्याही पलिकडे विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवत असतात. शाळेत शिक्षक पुस्तकं शिकवतात, पण बालभारतीचं पुस्तक का शिकायचं? हे राहून जातं. हे सांगायचा आमचा हा प्रयत्न आहे. ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमातून इतर विद्यार्थ्यांना हे नक्कीच कळेल, असे कार्यक्रमाचे लेखक आणि संकल्पनाकार प्रशांत डिंगणकर सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या