तिला कवितेतून जगणं गवसलं…

>> अशोक समेळ

जीवनाची शाळा खूप काही वेगळं शिकवून जाते. तिला वयाचे बंधन कधीच नसते. मानसीला वयाच्या 15 व्या वर्षी कर्क रोगाने ग्रासलं. या असाध्य आजाराला तिने मात दिलीच… पण या प्रवासात तिची कविता खऱया अर्थाने बहरली…

या प्रश्नाचं उत्तर तितकंसं सोपं नाही. माझी आजची कवयित्री आहे मानसी कुलकर्णी. तिला भाषेची उत्तम जाण आणि कवितेची आवड असणारी एका चौकोनी कुटुंबातील सुंदर मुलगी. ती दहावीत होती. जून-जुलै महिने पावसाचे आणि अभ्यासाचेही होते. अर्थात, दहावीत असणाऱया मुलामुलींना ही जबाबदारी समजते. तरीही
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळय़ावाचून झुलायचे होते!
ती स्वतःही उत्तम कविता वयाच्या पाचव्या वर्षापासून करायची. पाऊस हा सर्वांना आवडता…मानसीच्या अनेक कविता या पावसावरच आहेत.
पाऊस तसा जुन्या ओळखीचा त्याच वाटांवर पुनःपुन्हा थांबणारा
किंवा
मातीचा गंध ओला
तुझा माझा पाऊस चिंब भिजलेला
किंवा
तो पाऊस होऊन स्पर्शून गेला होता.
त्या खुणा रेंगाळल्यात वाटेवर जुन्या
माझी न मी उरले आभाळ फाटून रडले…
एका ‘टीएनएज’ मुलीचं जसं स्वतःचं वेगळं सुंदर जग असतं, तसंच मानसीचेही होतं आणि अचानक एक भयानक संकट कुठलीही चाहूल न देता आलं. दहावीच्या उंबरठय़ावर असताना मानसीला रक्ताचा कर्करोग झाला. तो ए.एल.एल. नावाचा भयानक कर्करोग होता. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिला दाखल करण्यासाठी नेलं तेव्हा मानसीच्या मनात एक सर्जनशील विचार आला. ‘अरे वा! ज्युपिटर म्हणजे गुरु. म्हणजे हा ग्रह मला नक्कीच बरा करणार !
आता कॅन्सर म्हटला की, भल्याभल्यांची गाळण उडते. आजही विज्ञान पुढे गेलंय तरी… आता कधीच परत येणार नाही या भावनेनंच गारद झालेले असतो. पण ही पंधरा वर्षांची चिमुरडी सकारात्मक विचार करीत होती आणि तिचं कुटुंबही! पिलाच्या पंखात बळ आल्यावर बाहेरच्या विशाल जगात त्याला उडता यावं, भरारी घेता यावी म्हणून पिलाला घरटय़ातून बाहेर ढकलावं लागतं. त्याला आकार द्यावा लागतो, त्या पिल्लाला कधी कधी पंखाखाली घेऊन त्याच्यावर मायेची पाखर घालावी लागते. ती मायेची पाखर… मायेचं पांघरूण तिची आई आणि सर्व कुटुंबाने घातलं आणि बाळाला पुनर्जन्मच दिला. कुटुंबानं एक प्रचंड मायेचा कोट केला!

वर्षभर आजाराशी झगडून मानसी सुरक्षित गुरूच्या हातून बाहेर आली आणि दहावीला बसून तिने 84 टक्के गुण मिळवून एसएससी परीक्षा पास झाली. या दरम्यान तिने मारलेली कवितेची भरारी किंवा तिची स्पंदने कौतुकास्पद आहेत.
आई… सर्व काही आईच आहे…
आई म्हणून ती मऊ कूस लेकराची
पोटात नाही दाणा तरी ओठी तिच्या अंगाई
आई म्हणून ती फुंकर जखमेवरती,
तिच्या नजरेस कळते आर्त साद हृदयीची
आई म्हणून ती वादळात तरणारी लव्हाळी
पण मायेचा पदर तिचा वटवृक्षाची सावली.
आई म्हणून ती वात होते समईची
आई म्हणून ती
उजळून अवघा संसार स्वतः झिजणारी ज्योती।
वा! शेवटी आईच मानसीचं सर्वस्व, प्रेरणास्थान, धैर्य आणि बळसुद्धा.
मानसीची कविता मरणालाही जगण्याची वाट दाखवणारी. सुंदरतेचं लेणं ल्यालेली बालकवींच्या ‘सुंदरतेला सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे’… या ओळी आमूलाग्र सुंदर आहेत.
कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव. मानसी आपल्या कवितेतून या उत्सवाचा महोत्सव साजरा करते आहे. तिचा ‘सूर गवसला’ ही कविता तिच्या श्वासांना घनसावळा सोबती मिळाल्याचा आनंद व्यक्त करते.
आज मनात काही दाटून आलं
पुन्हा नव्याने आभाळ भरून आलं…
थोडासा शिडकावा मातीत झाला,
विसावा शुष्कावलेल्या मनाला मिळाला
कोरडेपणाचा आव सगळा गळून गेला
आठवांच्या सोहळय़ात शब्दांना साज चढला।
बेधुंद वाऱयाला घन सावळा सोबती मिळाला,
आज कोठे श्वासांना मनमोकळा सूर ावसला…
कॅन्सरशी दोन हातांनं झुंजताना देखील तिनं जीवनाबद्दलची सकारात्मकता कधीच सोडली नाही.
बेधुंद वाऱयाला घन सावळा सोबती मिळाला…।
1 फेब्रुवारी 2012 या दिवशी चिमुरडय़ा मानसीला भेटायला कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर तिच्या घरी गेले आणि म्हणाले, ‘मानसी, तुझं आत्मकथन मी वाचलं. मी आज 83 वर्षांचा आहे. या वयात मरण जवळ येत असल्याची चाहूल लागते, पण तुझ्या आत्मकथनाने माझ्या जगण्याची उमेद वाढवलीस! तू आजारी असताना मी केवळ योगायोगाने तुला भेटायला आलो होतो. मी निरोप घेऊन परत जाताना तू विचारलेस, ‘तुम्ही मला परत कधी भेटणार? तेव्हा मी वचन दिलं तू बरी झाल्यावर मी तुला जरूर भेटायला येईन. तू तुझं वचन पूर्ण केलंस…
माझ्या आयुष्यातले सर्वोच्च आनंदाचे जे काही क्षण आहेत त्यातला हा एक क्षण…!
रडणारे खूप असतात
लढणारे क्वचित दिसतात
तू लढलीस आत्मविश्वासाने
आणि तुला सलाम केला मरणाने!

खरं सांगायचं तर कॅन्सरसारखे दुखणं सर्वसामान्य माणूस ‘भोगतो’. पण मानसी ते सर्व भाग भोगताना कॅन्सर जगली. कधी कधी होतं का असे काही? बोलायचे असते खूप पण काही शब्दच सापडत नाही, भावनांना वाहू द्यावे वाटते हे खरे पण वाहण्यासाठी कोणता रस्ताच सापडत नाही. दिशाहीन होऊन नुसतेच भटकावेसे वाटते.
थकल्यावर मात्र आपुलकीच्या सावलीत निजावेसे वाटते.
ओळखीच्या गर्दीत हरवलेला आपला चेहरा
का अनोळखी वाटायला लागतो स्वतःलाच,
कधीच उमगणार नाहीत का ही कोडी?
गुंतलेले हे प्रश्न सुटणार नाहीत का कधी?
सलाम मानसी तुझ्या धैर्याला…

आज मानसी M.Sc, Health Pcychology (City of University of London)ची सायकॉलॉजिस्ट आहे. तिचं ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथेला अनेक पुरस्कार लाभले असून ते अनेकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणास्रोत बनले आहे!
जाता जाता मानसी म्हणते,
वादळ केव्हाही शमले नव्हते,
किनारा तुझा मिळावा लाटेलाही कळले होते।
उजळलेला तू देखावा पाहिलास, ती मी नव्हते,
सावरून एकांतात मी तर विझले होते।
तो प्रहर असा अथांग अवकाश साक्षी होते.
कुठल्याशा नभात श्वासांचे हुंदके विरून गेले।
तुझ्या अंगणी बसरताना
न जाणे असे कित्येक ऋतू सरले।
रिकामपण जेव्हा काटय़ासम भासले,
सोडून दिले पाण्यावर सारे जुने दिवे।
डोळय़ातील मोती जिथवर वाहत गेले,
उमगले मला शिंपल्यात त्या माझे घरच नव्हते।।

मानसी, तुला अजून अनेक अवकाशांची क्षितिजे कवेत घ्यायची आहेत… तेव्हा अशीच लिहीत रहा… मस्त जग आणि सर्वांना हसत हसत जगायला शिकव!

आपली प्रतिक्रिया द्या