
लोकलमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱ्याला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला आझाद मैदान पोलिसांच्या स्वाधीन केले. सूरज जाधव असे त्याचे नाव आहे. दारूच्या नशेत त्याने यापूर्वीदेखील बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला. लोकलमध्ये बॉम्बस्पह्ट होणार असल्याचे सांगून फोन ठेवला. त्यानंतर त्या नंबरवर पोलिसांनी फोन केला. तो नंबर बंद होता. पोलिसांनी तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे उघड झाले. या घटनेच्या तपासाचे आदेश गुन्हे शाखेला दिले. घडल्या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ज्या नंबरवरून फोन आला तो नंबर सांताक्रुझ परिसरातील असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने फोन केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन केला होता. त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. जामिनावर असताना त्याने धमकीचा फोन केल्याचे तपासात समोर आले आहे.


























































