जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

49

सामना प्रतिनिधी, जालना

जालना शहरात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगाराच्या एडीएसच्या पथकाने मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून 46 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज 16 जुलै रोजी खबऱ्यामार्फत एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत मागील चार ते पाच दिवसांपूर्वी जालना ते संभाजीनगर रोडवर दोन इसमांनी एकता हॉटेलजवळ, पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करुन त्याच्या जवळील मोटार सायकल व बॅग व पाकीटातील नगदी रक्कम मारहाण करुन हिसकावून घेवून गेले ती चोरी सराईत गुन्हेगार आकाश देवकर व मुक्या उर्फ आकाश तरकसे यांनी केलेली असून त्यामधील दोन मधील एक आरोपी आकाश देवकर हा लालबाग येथील सिटीजन्स हॉटेल समोर उभा आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी त्यांच्या पथकाला सुचना देवून तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठविले. पोलीस आल्याचे कळताच आकाश देवकर पळण्याच्या तयारीत असतांना पथकाने त्यास झडप घालून ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच तीन ते चार दिवसांपुर्वी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास मी व माझा मित्र मुक्या उर्फ अशोक तरकसे असे आम्ही जालना ते संभाजीनगर रोडवर दारु पिण्यासाठी व जेवण करण्यासाठी गेलो होतो. एकता हॉटेलजवळ एक इसम हा मोटार सायकलसह मोबाईलवर बोलत असतांना आम्ही त्यास मारहाण करुन त्यांची जवळील डिस्कव्हर कंपनीची मोटारसायकल व एक काळ्या रंगाची बॅग व खिशातील पाकीट मारहाण करुन हिसकावून पळून गेलो. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यानी आणखी कबुली दिली की, त्याच दिवशी संग्रामनगर येथील देशीदारुच्या पाठीमागे असलेल्या घरी जावून एका माणसाला व महिलांना धमकी देवून त्यांच्या जवळील एक मोबाईल व 1 हजार 400 रुपये नगदी जबरीने काढून घेतले तसेच दुसऱ्या दिवशी वरकड हॉस्पीटल जालना जवळील एका घरात पाणी पिण्यासाठी मागून घरात घुसून एका माणसाचा गळा दाबून दमदाटी करुन त्याच्या जवळील दोन मोबाईल व नगदी 14 हजार 800 रुपये चोरुन नेले होते. अशी कबुली दिल्याने सदर सराईत आरोपीकडून एक मोटार सायकल ज्याची किंमत २० हजार रुपये व नगदी 1600 रुपये, तीन विविध 13 हजार रुपये किंमतीचे कंपनीचे मोबाईल व एक पेनड्राईव्ह असा एकूण 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक एस.चैतन्या, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, ज्ञानदेव नागरे, नंदु खंदारे, किरण चव्हाण, अनिल काळे, चंदु माळी आदींनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या