पोलीस डायरी – कुणापुढेही न झुकणारा! धाडसी अधिकारी

>> प्रभाकर पवार, [email protected]

सदानंद वसंत दाते यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडून ३ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्याआधी ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक होते. सदानंद दाते येत्या डिसेंबर अखेरीस सेवानिवृत्त होणार होते, परंतु रश्मी शुक्ला यांच्याप्रमाणे दाते यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२७ डिसेंबर अखेरपर्यंत (२ वर्षे) सदानंद दाते महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करणार आहेत. ही बाब महाराष्ट्र पोलीस दलातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुखावणारी आहे. ज्यांचा कुणी वाली नाही, गॉडफादर नाही अशा पोलिसांना आपल्या समस्या मांडण्यासाठी या नव्या कर्तव्यतत्पर महासंचालकाला थेट भेटायला आता कोणत्याच अडचणी येणार नाहीत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे किंवा त्यांच्यापुढे न झुकणारे एक धाडसी अधिकारी अशी सदानंद दाते यांची पोलीस दलात प्रतिमा आहे.

सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. प्रशिक्षण काळ पूर्ण केल्यानंतर ऑक्टोबर १९९३ मध्ये त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून चिपळूणला पहिले पोस्टिंग मिळाले. चार्ज घेतल्यानंतर सदानंद दाते आपल्या पोलीस अधीक्षकांना ‘कॉल ऑन’ करण्यासाठी त्यांच्या रत्नागिरी कार्यालयात गेले, परंतु नॉन आयपीएस असलेल्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने सदानंद दाते यांना दोन तास कॅबिनबाहेरच उभे केले. ज्या वेळी कॅबिनमध्ये बोलाविले तेव्हा त्यांना खुर्चीत बसायलाही सांगितले नाही. त्यांना उभे करून दारू, जुगाराच्या अनुयांवर धाडी न घालण्याचे आदेश दिले तेव्हा या नवख्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने त्या वरिष्ठाला सांगितले, “माझ्याकडे कुणी तक्रार केली तर मी दुर्लक्ष करणार नाही. मी कारवाई करणार,” असे ठणकावून सांगून सदानंद दाते कार्यालयातून निघून गेले.

सदानंद दाते गैरधंद्यांविरुद्ध आहेत ही बातमी वाऱ्यासारखी कोकणात पसरली आणि दातेंच्या कार्यालयाबाहेर तक्रारदारांच्या रांगा लागल्या. सदानंद दातेंनी आठवडाभरात जुगार व दारूचे सर्व अड्डे नेस्तनाबूत केले तेव्हा महिला वर्ग खूश झाला. परंतु महिलांचा हा आनंद फार काही टिकला नाही. सदानंद दातेंची एका आठवड्यात बदली झाली. त्यांना वर्ध्याला पाठविण्यात आले. तिथेही तेच कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या व बेकायदा कामांना विरोध करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या त्यामुळे वारंवार बदल्या होऊ लागल्या, परंतु दातेंनी पोस्टिंगला कधीच महत्त्व दिले नाही. त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. कुठल्याही सत्ताकेंद्राशी त्यांनी जवळीकही साधली नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्यावर अन्याय झाला तरीही त्यांनी शांतपणे काम केले. स्वतःला ते कधीही हिरो समजले नाहीत.

सदानंद दाते हे मूळचे पुण्याचे. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. पुणे हे विद्येचे माहेरघर! सुसंस्कृत शहर हे आपण कालपरवापर्यंत ऐकत होतो ते चांगले संस्कार झालेल्या सदानंद दातेंसारख्या उपजत गुणवंत शिष्टाचारी तरुणांमुळेच! यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पोलीस दलात दाखल होऊन काहीतरी करून दाखविण्याची दातेंमध्ये जबरदस्त ऊर्मी होती, परंतु नोकरीच्या पहिल्याच दिवशी एका भ्रष्ट अधिकाऱ्याने त्यांचा मनोभंग केला. (Mental breakdown) ज्या-ज्या जिल्ह्यांत त्यांची बदली व्हायची त्या-त्या ठिकाणी त्यांना आपल्या सिस्टमविरुद्धच लढावे लागायचे. मुंबई शहरात बदली झाल्यावर मात्र त्यांना ‘स्कोप’ मिळाला. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या वेळी दातेंनी केलेली बंदोबस्ताची व्यवस्था ही त्यांच्या कौशल्याची पोचपावती होती. त्या वेळी सदानंद दाते यांच्याकडे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी होती. शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेला लाखो जनसमुदाय लोटला होता. अशा तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेला संयम व बंदोबस्त अभूतपूर्व होता. याचे श्रेय सदानंद दाते, त्यांच्या सहकाऱ्यांना व पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांना द्यावेच लागेल.

सदानंद दाते यांनी सहपोलीस आयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी चोखपणे बजावल्यानंतर त्यांना मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख करण्यात आले. तिथेही त्यांनी रवी पुजारी ही संघटित टोळी आपल्या पद्धतीने संपविली, तीही एकही गोळी न झाडता. दातेंचा विरोध पोलिसांच्या एन्काऊंटरला नव्हता तर त्यांचा विरोध कॉन्ट्रक्ट किलिंगला होता. सदानंद दाते हे एक सभ्य व अभ्यासू अधिकारी, परंतु तितकेच ते निर्भीड व धाडसी. २६/११ ला पाकिस्तानने जेव्हा मुंबईवर हल्ला केला तेव्हा हा अधिकारी स्वतः मैदानात उतरून अतिरेक्यांशी लढला. जखमी झाला तेव्हा टीव्ही चॅनेलवाल्यांनी तर त्यांना ‘शहीद’च करून टाकले होते, परंतु त्यांना अवगत असलेल्या ध्यान धारणेमुळे त्यांनी मृत्यूवर मात केली. असा हा कोणतीही जोखीम घेणारा, आपल्या फिल्डवरच्या टीमवर विश्वास ठेवणारा, त्यांना यशाचे श्रेय देणारा अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख झाल्याने साऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना व नागरिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. गेली पाच-सहा वर्षे पोलीस महासंचालक कार्यालयात अक्षरशः अंधार व शुकशुकाट होता. आपणास न्याय मिळणार नाही म्हणून कुणी त्या वास्तूकडे सहसा फिरकत नव्हते. आता त्या वास्तूत एका प्रामाणिक व सकारात्मक अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने तेथील मंदावलेले दिवे पुन्हा उजळून निघतील आणि सामान्यांना न्याय मिळेल. अशी अपेक्षा करायला कोणतीच हरकत नाही. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांपुढे नांग्या टाकणारे बरेच अधिकारी आपण पाहिले. सदानंद दाते त्याला अपवाद असतील एवढे नक्की! एनआयएनेही ज्या अधिकाऱ्यासमोर हात टेकले त्यांच्याबद्दल आणखी काय बोलणार?