पोलीस डायरी : मुळावर येणारे नोकर

556

>> प्रभाकर पवार

वामन मल्हार जोशी हे 70 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बोरिवली (पश्चिम), जांभळी गल्ली येथे आपला 35 वर्षांचा अविवाहित तरुण मुलगा विलास याच्यासोबत राहत होते. वामनरावांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने वामनराव यांच्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी होती. बोरिवली (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळच जोशी यांचे सद्गुरू नावाचे स्नॅक्सचे दुकान असून हे दोघेही बापलेक ते सांभाळत होते. डोसा, फ्रॅन्की आदी खाद्यपदार्थांची विक्री करणारे बापलेक सकाळी 9 वाजता दुकानात जायचे तर रात्री 10 नंतर दुकानापासून जवळच असलेल्या आपल्या घरी परतायचे. बुधवार, 17 एप्रिलच्या महावीर जयंतीला मात्र दुपारी घरी जेवायला गेलेले वामनराव पुन्हा आपल्या स्नॅक्सच्या दुकानात परतले नाहीत. सायंकाळी 5 वाजता दुकानात असलेल्या विलासने त्यांना मोबाईलवर व घरच्या फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु फोन काही उचलला गेला नाही. तेव्हा मुलाने तत्काळ आपल्या घरी धडक मारली असता त्याचे वडील सोफ्यावर निपचित पडलेले दिसले. कोणतीही हालचाल नाही. आजूबाजूला सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. विलासने ताबडतोब पोलिसांना व डॉक्टरांना बोलावले असता वामनरावांनी तासाभरापूर्वीच हे जग सोडले होते. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता व घरातील रोकड पळविण्यात आली होती असे उघड झाले.

ज्येष्ठ नागरिकाची हत्या म्हटल्यावर पोलीस उपआयुक्त संग्राम निशाणदार यांनी याची गंभीर दखल घेतली. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे, सुधीर घोसाळकर, महेश तावडे, जीवन निरगुडे, नीलेश मोरे, चव्हाण, सुशील सावंत, सर्फराज खान आदी अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तयार करून कसून तपास करण्याचे आदेश निशाणदार यांनी सर्वांना दिले. तरीही उपायुक्त निशाणदार यांचे समाधान झाले नाही. त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी अडाणे व मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम नायर या हुशार  व तपासात निष्णांत असलेल्या दोन अधिकार्‍यांची तपासकामी नेमणूक केली आणि या अधिकार्‍यांनी आपली निवड सार्थ ठरवली.

बोरिवली पोलीस ठाण्याचे पथक व या दोन अधिकार्‍यांनी बोरिवलीत खून करून बंगळुरूत पळालेल्या व त्यानंतर मुंबई पोलीस मागे लागल्याचा सुगावा लागताच तामीळनाडूमध्ये लपलेल्या तीन खुन्यांना आठ दिवसांत अतिशय मेहनत घेऊन व जीव धोक्यात घालून अटक केली. त्याबद्दल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी उपायुक्त संग्राम निशाणदार व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले आहे. संग्राम निशाणदार यांनीही पोलीस निरीक्षक रवी अडाणे, घनश्याम नायर व बोरिवली पोलीस पथकाची जाहीरपणे पाठ थोपटली आहे.

महेश चंद्रेगौडा (28), अनिलकुमार पुट्टा स्वामी गौडा (27) व किरणकुमार नंनजुंडे गौडा (27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सारे आरोपी कर्नाटकातील मंड्या जिह्यातील आहेत. त्यातील प्रमुख आरोपी महेश गौडा हा वामन जोशी यांच्या स्नॅकच्या दुकानात कामाला होता; परंतु दोन वर्षांपूर्वीच तो वामन जोशी यांचे स्नॅकचे दुकान सोडून बंगळुरूला आपल्या गावी जाऊन तेथेच स्थायिक झाला होता. त्याला जुगाराचे व दारूचे व्यसन असल्यामुळे तो कर्जबाजारी झाला. तेव्हा त्याला आपला जुना मालक वामन जोशी आठवला. जोशी यांच्याकडे काही लाख रुपये असतील याची खात्री असल्याने त्याने आपल्या गावच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन 17 एप्रिल रोजी वामन जोशी यांच्या घरावर दरोडा घातला व त्यांची हत्या केली; परंतु त्याचा हेतू काही साध्य झाला नाही. त्याच्या हाती फक्त 10 हजार रुपये लागले. ते घेऊन महेश गौडा व त्याचे साथीदार पुन्हा कर्नाटकात पळून गेले. पोलिसांकडे याचा कोणताही पुरावा नसताना त्यांनी अगदी कौशल्याने तपास केला आणि आरोपींना पुन्हा महाराष्ट्राच्या राजधानीत आणले. त्याबद्दल उपायुक्त संग्राम निशाणदार व यांचे सहकारी रवी अडाणे, घनश्याम नायर, सुधीर घोसाळकर, महेश तावडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. महेश गौडा हा वामन जोशी यांचा नोकर होता. त्याला वामन जोशी हे एकटे घरी असतात, त्यांच्याकडे काही लाख रुपये पडून आहेत याची माहिती असल्यामुळेच त्याने दरोड्याचा कट रचला होता.

सोडून गेलेल्या किंवा कामावरून काढून टाकण्यात आलेल्या आजी-माजी नोकरांकडून मोठ्या प्रमाणात खूनखराबा व लुटमार केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत असतानाही कोणतीही खातरजमा न करता मुंबईसारख्या शहरात आज गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांना नोकर्‍या दिल्या जात आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातील लुटेरे मुंबईत येत असतात आणि हात मारून पुन्हा आपल्या गावी परतत असतात. त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस सतत महाराष्ट्राबाहेर असतात. मुंबई पोलीस कधी यूपी-बिहार तर कधी दिल्लीला तपासासाठी गेलेले नाहीत असे कधी झालेले नाही. मुंबई पोलिसांची सारी यंत्रणा परप्रांतीय नोकरांचा, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीच सतत राबत असते. मालक असो अथवा मालकीण नियत फिरल्यावर घरातील नोकर त्यांना ठार मारून घरातील ऐवज पळवून नेतात. नोकर ठेवण्यापूर्वी त्याची मानसिकता, त्याचा पूर्वइतिहास माहीत असणे आवश्यक असते, परंतु याची कुणीही गांभीर्याने  दखल घेत नाही. आपल्या घरात नोकर ठेवण्यापूर्वी त्याच्या छायाचित्रासह माहिती द्या, अशी स्थानिक पोलीस वारंवार विनंती करतात. पत्रके काढून आवाहन करतात; परंतु त्याची कुणी गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळेच गुन्हेगारी  प्रवृत्तींच्या नोकरांचे फावले आहे. घरातही धोका आणि घराबाहेरही धोका, घरात कुणी येऊन गळा दाबेल याची शाश्वती नाही व घराबाहेर पडल्यावर कुणी हल्ला करेल याचाही नेम नाही. त्यामुळे घरात एकाकी जीवन जगणार्‍या वृद्ध स्त्री-पुरुषांचे तर जीणे हराम झाले आहे. आज मालकाच्या जिवाला जीव देणारे नोकर कमी आढळून येत आहेत. प्रामाणिकपणा संपत चालला आहे. काढून टाकलेला, सोडून गेलेला महेश गौडासारखा क्रूरकर्मा नोकर आपल्या साथीदारांना सोबत घेऊन कधी तुमच्या दारावर थाप मारेल हे काही सांगता येणार नाही. तेव्हा काढून टाकलेल्या, सोडून गेलेल्या नोकरांपासून सावधान!

आपली प्रतिक्रिया द्या