>> प्रभाकर पवार ([email protected])
काठीवाला दादा आपल्या लघवीच्या ठिकाणी काय चाळे करतोय हे त्या चिमुरडीला कळतच नव्हते. जेव्हा तिला वेदना होऊ लागल्या, जळजळ वाढली तेव्हा ती ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज बाथरूममधून बाहेर जाईल व आपले पितळ उघडे पडेल म्हणून त्या नराधम दादाने त्या चार वर्षांच्या बालिकेच्या कानाखाली मारली. ती लहानगी भीतीने चिडीचूप झाली. वर्गात गेल्यावर रडू लागली तेव्हा शाळेतून पालकांना 13 ऑगस्ट रोजी फोन गेला, “तुमची मुलगी रडत आहे. कृपया तिला घेऊन जावे.” पालक शाळेत पोहोचले तेव्हा नेहमी एकटीच चालत शाळेबाहेर येणारी मुलगी एका शिक्षिकेचा हात धरून लटपटत शाळेबाहेर आली त्या मुलीच्या आजोबांना संशय आला. त्यांनी त्या मुलीला डॉक्टरकडे नेले तेव्हा डॉक्टर म्हणाले, “तिच्या लघवीच्या ठिकाणी एक सेंटिमीटर इजा झाली आहे. ही इजा नॉर्मल नाही. तिच्या लघवीच्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली आहे” हे ऐकल्यावर आईला धक्का बसला.
मुलगी त्या दिवशी रात्री झोपलीच नाही. रात्री उठून असंबद्ध बोलू लागली व हातवारे करू लागली. दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे पालक शाळेच्या संस्था चालकांकडे गेले, त्यांना अनेक प्रश्न विचारले. तेव्हा मुलींना बाथरूममध्ये घेऊन जाण्यासाठी आमच्या शाळेत महिला आहेत. पुरुष कर्मचारी नाहीत’ अशी थाप त्यांनी मारली. संस्था चालक खोटे बोलत आहेत असे लक्षात आल्यावर त्या मुलींचे पालक बदलापूर पोलीस ठाण्यात गेले, परंतु तेथेही तत्काळ तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. मुलीने सायकल चालविल्यामुळे गुप्तांगाला इजा झाली असल्याचा दावा वरिष्ठ निरीक्षक असलेल्या अधिकारी महिलेने केला. मात्र पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांना तक्रारीची दखल घ्यावीच लागली. बदलापूरमधील एका शाळेतली ही भयंकर घटना. या शाळेत स्वीपरचे काम करणाऱ्या अक्षय शिंदे (23) या विकृताने शिशू वर्गात शिकणाऱ्या आणखी एका चिमुरडीवर असाच अत्याचार केल्याचे उघड झाले आणि मग लोकांचा संताप अनावर झाला. हजारोंच्या संख्येने बदलापूरकर रस्त्यावर उतरले. बदलापूर शहर व लोकल ट्रेन 10 तास बंद पाडल्या. याचे पडसाद महाराष्ट्रासह साऱ्या देशात उमटले.
बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या, विनयभंगाच्या तक्रारीचा एफआयआर दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. त्यामुळे कुणीही पीडित महिला पोलीस ठाण्यात जाण्यासाठी धजावत नाही. बदलापूरवासीयांनी रस्त्यावर येऊन आपला इंगा दाखविल्यानंतर आता शासन व पोलीस खढबढून जागे झाले आहेत. आता पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवून घेतली जात आहे. बदलापूर व कोलकातावासीयांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच राज्यकर्ते भानावर आले आहेत, परंतु हे किती दिवस चालणार आहे हे बघावे लागेल कारण पोलिसांवर फार दबाव आहे. राजकीय पुढाऱ्यांशी, सत्ताधाऱ्यांशी संशयित आरोपी संबंधित असेल तर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाले ती शाळा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची आहे. त्यामुळेच पोलिसांनी ती चिमुरडी व तिच्या पालकांना तीन- चार दिवस वणवण भटकवायला लावले.
मुख्यमंत्री व त्यांच्या खासदार मुलाचा मतदारसंघ असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सारे पोलीस कायम वाकलेले व दबावाखाली असतात. कधी पोलीस ठाण्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, आमदार गोळीबार करतील याची शाश्वतीच नसते बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी थैल्या ओतून क्रीम व मोक्याच्या पोस्टिंग मिळविलेल्या असल्यामुळे असे भ्रष्ट अधिकारी काम करीत नाहीत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गरीबांना न्याय मिळत नाही. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. ठाणे पोलिसांची ओळख ही एक राज्यकर्त्यांची कठपुतली बाहुली अशीच जनमानसात झाली आहे. त्यामुळे लोकांना आज रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागत आहेत.
बदलापूर पोलीस व शाळा चालकांनी वेळीच दखल घेतली असती तर लोक रस्त्यावर उतरले नसते. आता तर न्यायालयाने बदलापूरच्या आदर्श शाळेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक यांनाही आरोपी केले आहे. बालक लैंगिक अत्याचार कायद्यान्वये पोलिसांनी ‘सीडब्ल्यूसी’ला (Child welfare Committee) कळविले नाही किंवा पोलिसांनीही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरुद्धही प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्सेस अॅक्ट अन्वये (pocso) गुन्हा दाखल होतो हे प्रत्येक शाळा चालकांनी व राज्यकर्त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांनी लक्षात ठेवले पाहिजे.
बदलापूरवासीयांनी एक आंदोलन केल्यावर राज्यकर्ते सुतासारखे सरळ झाले. बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी पोलीस दाखल करून घेऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील कारागृहे ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागली आहेत. विकृत नराधमांची वाढती संख्या पाहता सरकारला त्यांच्यासाठी नव्याने जेल बांधावे लागणार आहेत.
आपल्या देशात आज मिनिटागणिक महिलांवर अत्याचार होत आहेत. नवजात बालकांपासून ते अगदी सत्तर-ऐंशी वर्षांपर्यंतच्या वृद्धांनाही सोडले जात नाही मग तुम्ही कितीही सीसीटीव्ही फुटेज किंवा पॅनिक बटण लावा, कामाच्या ठिकाणी ‘विशाखा’, ‘सखी सावित्री’ समिती नेमा, त्याचा काहीही उपयोग होत नाही. जोपर्यंत आरोपीना भरचौकात फाशी दिली जाणार नाही, त्यांचे लिंग छाटले जाणार नाही, तोपर्यंत आपल्या देशात सुसाट सुटलेल्या पिसाटांवर निर्बंध येणार नाहीत, परंतु हे काम मुर्दाड सरकार कधीच करणार नाही. ते जनतेलाच करावे लागणार आहे. तरच आपल्या आयाबहिणी, लहान बालके सुरक्षित राहतील.
मुली जन्माला येणे म्हणजे आता पाप झाले आहे. रेडिओ मिर्चीचे प्रसिद्ध रेडिओ जॉकी नावेद यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ती क्लिप डोक्याला झिणझिण्या आणणारी होती. सध्या देशपातळीवर जे काही बलात्कार कांड सुरू आहे, त्यावर त्यांनी एक क्लिप तयार करून संताप व्यक्त केला होता. एका स्त्रीरोग विशेषज्ञ महिलेला (Gynaecologist) नावेद फोनवर संपर्क साधून विचारतात, ते संभाषण पुढीलप्रमाणे –
नावेद (आरजे) “मॅडम, आप गाइनॅकॉलॉजिस्ट है ना?”
गाइनेंकॉलॉजिस्ट “हां बोलिये क्या काम हैं?”
नावेद – “मेरी वाईफ प्रेग्नंट है चार महिने की. और मुझे अॅबॉर्शन करना है.”
गाइनॅकॉलॉजिस्ट “क्यूं, क्या प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स है?”
नावेद “कुछ नही मॅडम. बच्ची होने वाली है ऐसा दिख रहा है. मेरी वाईफही बोल रही है. लेकीन मुझे वो लडकी को रखना नहीं है.”
गाइनॅकॉलॉजिस्ट (भडकते व म्हणते) “अरे, आप पागल है क्या? मैं तुमको जेल में डालूंगी. तुमको लडकी नहीं, लडका चाहिए। कितने बेशरम लोग हो तुम। मैं एक औरत हूं, मुझसे ऐसी बाते कर रहे हो?”
नावेद “मॅडम, लडका नहीं, मुझे लडकीही चाहिए. लेकिन आज देश का माहौल देखकर मुझे बच्ची पैदा करनी नहीं है. क्योंकी उसके उपर रेप हो जायेगा जवान होगी तो मै उसको संभाल नहीं पाऊंगा. इसके लिए मुझे बच्ची पैदा ही करनी नहीं है मुझे लडकी का संकट झेलना नहीं है.” मुलगी जन्माला आली तर तिच्यावर बलात्कार होईल असा जर प्रत्येकाने विचार केला तर भविष्यात या समाजाचे काय होणार आहे?