गणेशोत्सवात गर्दीवर पोलिसांची लाईव्ह नजर

गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांचे सीसीटीव्ही कॅमेरे थेट पोलिसांच्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येणार आहेत. यामुळे मंडप परिसरातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे थेट लक्ष राहणार असून, एखादी घटना घडताच तत्काळ कार्यवाही शक्य होणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. त्यामुळे वाहतूककोंडी, चेंगराचेंगरी, पाकीटमारी, चोरी किंवा संशयास्पद हालचालींसारख्या घटना घडण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येक मंडळाला मंडप परिसरात पुरेशा संख्येने कॅमेरे बसविण्याचे सांगितले आहे. त्यांचे फीड थेट नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. पोलिसांच्या मते, सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयितांची ओळख पटवणे, त्यांच्यावर नजर ठेवणे आणि परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळवणे सोपे होईल. कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरमध्ये थेट पब्लिक अॅड्रेस (पीए) सिस्टीमची सुविधा उपलब्ध आहे. गर्दी वाढल्यास, रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर पोलीस नियंत्रण कक्षातून थेट उद्घोषणा करून नागरिकांना मार्गदर्शन करता येईल. ही व्यवस्था नागरिकांमध्ये शिस्त राखण्यासाठी व सुरक्षाव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जोडण्यासाठी मंडळांना तांत्रिक मदतीची आवश्यकता असल्यास ती पोलिसांतर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मंडळांना वीजजोडणीसाठी ‘एक खिडकी’
पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी त्वरित आणि सुलभ पद्धतीने मिळावी यासाठी महावितरणने रास्ता पेठ पावर हाऊस येथे ‘एक खिडकी सुविधा’ सुरू केली आहे. सर्व मंडळांनी या सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले.

वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल अशी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. सर्व अर्ज रास्ता पेठ येथील मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रामध्ये स्वीकारले जातील. यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात कोणताही वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई आणि देखावे उभारताना विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्यावी आणि सर्व मंडळांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले.

अनामत रक्कम ऑनलाइन भरावी
तात्पुरत्या जोडणीसाठी मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे बंधनकारक असून ती ऑनलाइन भरल्यास उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम तातडीने परत केली जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी ऑ नलाइन पद्धतीनेच अनामत रक्कम जमा करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.