पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या

शीव प्रतीक्षानगर येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या विजय साळुंखे (38) या पोलीस अंमलदाराने भिंतीच्या कडीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

विजय साळुंखे हे शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान पोटदुखीचा त्रास असल्याने ते 30 मे पासून कर्तव्यावर गैरहजर होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विजय साळुंखे यांनी राहत्या घरातील भिंतीला असलेल्या कडीला नायलॉनच्या रस्सीने गळाफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साळुंखे यांच्या अंगावर असलेल्या कपडय़ांची तपासणी केली असता त्यांच्या हाफ चड्डीच्या खिशात मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली. पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे साळुंखे यांनी त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.