पोलीस शिपाई भरतीतील गोलमाल उघड; 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत उमेदवारांकडून चिपची अदलाबदल

पोलीस दलात भरती व्हावे यासाठी लाखो तरुण जिवाचे रान करत आहेत. परंतु काही तरुण नको ती शक्कल लढवून चुकीच्या मार्गाने जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करताना आढळलेत. घाटकोपर येथे सुरू असलेल्या मैदानी चाचणीच्या 1600 मीटर धावण्यामध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी चौघांनी एकमेकांना मदत करण्यासाठी चिपची अदलाबदल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे पोलिसांच्या मैदानात पोलीस शिपाई भरतीसाठी पुरुषांची मैदानी चाचणी सुरू आहे. आज विजय काछवाय आणि यश कछवाय हे दोघे भाऊदेखील मैदानी चाचणीमध्ये सहभागी झाले होते. मात्र 1600 मीटर धावणेच्या वेळेस या भावांनी एकमेकांना जास्त गुण मिळविण्याच्या उद्देशाने पायाला लावण्यासाठी दिलेल्या चिपची अदलाबदल केल्याचे आढळून आले. तांत्रिक अहवालात ही बाब समोर येताच पोलीस निरीक्षक मनीष आवळे यांच्या तक्रारीवरून या दोन्ही भावांविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम 318 (4), 319, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नको ते डोके लढविल्यामुळे या दोन्ही भावांचे पोलीस व्हायचे स्वप्न तर भंगले.

दरम्यान, 29 ऑगस्टलादेखील राहुल शिंदे आणि ओमकार पवार या दोघा उमेदवारांनी 1600 मीटर धावणेवेळी चिपची अदलाबदल केली होती. त्यांनी केलेला हा गैरप्रकार समोर आल्यानंतर या दोघांविरोधातदेखील पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत चौघांविरोधात चिपची अदलाबदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.