पोलीसभरतीसाठी लेखीपरीक्षेची तारीख जाहीर, चालकपदासाठी 26 मार्च, तर शिपाईपदासाठी 2 एप्रिलला होणार परीक्षा

मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. चालकपदासाठी 26 मार्च, तर शिपाईपदासाठी 2 एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

मुंबईवगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीसभरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. नगर जिल्हा पोलीसदलातील 10 चालकपदासाठी 93 उमेदवार, तर पोलीस शिपाईपदाच्या 129 जागांसाठी 1606 उमेदवार पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची असेल. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ असेल. जिल्हा पोलीस दलातील चालक व शिपाई अशा 139 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

एकूण 11 हजार 278 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 6707 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. 3 हजार 669 उमेदवार गैरहजर राहिले. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला. उपस्थित उमेदवारांपैकी 6 हजार 721 उमेदवार जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या चाचणीसाठी पात्र ठरले.

883 उमेदवार चाचणीपूर्व तपासणीत पात्र ठरले होते. चाचणी दिलेल्या 6 हजार 721 उमेदवारांपैकी 3 हजार 278 उमेदवार उत्तीर्ण झाले. 3 हजार 443 उमेदवारांना 25 पेक्षा कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण ठरविण्यात आले आहे. चालकपदाच्या 10 जागांसाठी 219 उमेदवार उत्तीर्ण झाले, तर शिपाईपदाच्या 129 जागांसाठी 3 हजार 59 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. गुणानुक्रमानुसार त्यांना लेखीपरीक्षेसाठी पात्र ठरवले गेले आहे.

लेखीपरीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे

लेखीपरीक्षेचे ठिकाण अद्यापि निश्चित झालेले नाही. पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केली जाणार आहेत. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत, खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे; अन्यथा प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडीओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठय़ाचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. लेखीपरीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक ओला यांनी व्यक्त केली.