मुंबईतील विक्रोळी परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीत ओला ड्राव्हयरला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी दामप्त्यावर गुन्हा दाखल केला.
ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी अंतरा असे आरोपी दामप्त्याचे नाव आहे. ते घाटकोपर परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान, आधी ऋषभ यांनी ओला चालकाच्या गाडीला धडक दिली. यामुळे ओला चालकाच्या गाडीचे नुकसान झाले. या प्रकाराची नुकसान भरपाई घेण्यासाठी ओला चालकाने ऋषभ यांच्या गाडीचा पाठलाग केला. यावेळी ड्रायव्हरने ऋषभ चक्रवर्ती यांच्या AUDI Q3 कारला धडक दिली.
या घटनेनंतर संतापलेल्या जोडप्यांनी ड्रायव्हरशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी ऋषभ यांना राग अनावर झाला आणि त्यांनी ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. ऋषभ यांनी ड्रायव्हरला उचलून जमिनीवर आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी ड्रायव्हरच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी दामप्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोंपीचा शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.