सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात उरणमधला युथ मार्च पोलिसांनी रोखला; अनेक आंदोलकांना अटक

748

नागरीकत्व सुधारणा कायदा(सीएए), एनपीआर, एनआरसी विरोधात काढण्यात आलेला युथ मार्च उरण पोलिसांनी रोखला असून अनेक आंदोलनकांना अटक केली. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याचा विरोध करण्यासाठी उरण (बीपीसीएल) ते चैत्य भूमी असा युथ मार्च (16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी ) डीवायएफआय व डाव्या संघटनांकडून काढण्यात येणार होता. मात्र हा युथ मार्च निघताच उरण पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखून धरले आणि त्यांना न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेले. या युथ मार्च साठी राज्य भरातून शेकडो तरूण आले होते.

देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याच्या नावावर देशाची संपती लुटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. एलआयसी, ओएनजीसी, एयर इंडिया, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन सारख्या उद्योगाचे खाजगीकरण करण्याचे धोरण सरकार अवलंबत आहे. युवकांना शिक्षण आणि नोकऱ्या नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत. या आवश्यक गरजांवर उपाय योजना करण्याऐवजी केंद्र सरकार सीएए, एनआरसी, एनपीआरसारखे विषय लावून धरत लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांतर्फे करण्यात आला. सीएए, एनआरसी, एनपीआर देखील याच षड्यंत्राचा भाग आहे. धर्मावर आधारित नागरिकत्व देणे हे घटनेविरुद्ध आहे. बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्वीपासून सुरू आहे. त्याकरता एनआरसी लागू करण्याची गरज नाही. सर्वात प्रथम एनपीआर थांबविण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र हा मार्च उरण पोलिसांनी उरण मध्येच रोखल्याने रविवार संध्याकाळपर्यंत युथ मार्च उरणमध्येच अडकून पडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या