जालन्यामध्ये अल्पवयीन नववधू तिच्या प्रियकरासोबतपळून गेली होती. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला असून तिच्या प्रियकराला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराने त्याच्या 16 वर्षांच्या मुलीला शिक्षणासाठी जालना तालुक्यातील धारकल्याण येथे बहिणीकडे पाठवले होते. त्यादरम्यान त्या मुलीचे महेश घोडके (20, रा. धारकल्याण) सोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या वडिलांनी अंबड तालुक्यातील आपल्या मूळगावी 31 मे 2024 रोजी नात्यातीलच एका मुलासोबत तिचे लग्न उरकले होते.
लग्नाच्या तिसर्या दिवशी मुलगी माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर त्या नववधू आणि तिचा पूर्वीचा प्रियकर महेश घोडके यांचा संपर्क झाला आणि त्यांनी 12 जून रोजी पळून जाण्याचा प्लॅन आखला. 12 जूनला दुपारी 4 वाजता वडिलांना मोबाईलवर मी ब्लॉऊज आणण्यासाठी जात असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली होती. आई-वडील आणि नातेवाईकांनी मुलीचा खूप शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यांनतर दोन दिवसांनी 14 जून रोजी वडिलांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी मुलीच्या प्रियकरासह त्याच्या काही मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस आणि पिंक मोबाईल पथक यांनी संयुक्तिकरित्या केला. पोलिसांनी तपासादरम्यान मुलीच्या प्रियकराच्या मित्राची चौकशी केली असता 12 जून रोजी प्रियकर महेश घोडके हा मुलीला मोतीबाग येथून मोटारसायकलवरून घेऊन परभणीला गेल्याची माहिती मिळाली. परभणी येथून रेल्वेने हैद्राबाद येथे गेल्याचे समजले. महेश घोडके आणि त्या मुलीने हैद्राबादमध्ये एका ठिकाणी भाड्याने खोली घेऊन तिथेच संसार थाटण्याचा विचार केला होता. मात्र, अल्पवयीन मुलीने परत जालन्याला जाण्याचा तगादा लावल्याने ते दोघे रेल्वेने छत्रपती संभाजीनगर येथे आले होते.
पोलीस आणि नातेवाईकांनी या दोघांची समजूत काढून त्यांना जालन्यात आणले. हैद्राबाद येथे भाड्याच्या खोलीत महेश घोडके याने बलात्कार केल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. त्यावरून गुन्ह्यामध्ये बलात्काराचे कलम वाढविण्यात आले आहे. अटकेत असलेल्या प्रियकर महेश घोडके यास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.