नगरमधील नेवासे तालुक्यात 15 दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यास आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
अंबादास भानुदास म्हस्के असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मीना अंबादास म्हस्के आणि लहू शिवाजी डमरे अशी आरोपींची नावे आहेत. पाचेगाव शिवारात 16 ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न पटल्याने मृत व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मृताचा फोटो राज्यभरातील पोलीस ठाणे आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले.
सीसीटीव्हीमध्ये घटनास्थळाच्या परिसरात एक चारचाकी कार संशयितरित्या फिरताना आढळून आली. या कारची माहिती घेतली असता ही कार मृत अंबादासच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कार मालक अंबादासशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन 15-20 दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी मीनाची माहिती मिळवली. यावेळी मीना ही इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी इंदापूर गाठत मीना आणि तिचा प्रियकर डमरे यास ताब्यात घेतले. यावेळी डमरेकडे चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.