वडाळय़ात पोलिसांचे ‘ऑपरेशन तळीराम’, 253 जणांवर कारवाई, तीन लाखांची दंडवसुली

सामना ऑनलाईन । वडाळा

वाईन शॉपमधून दारू घेतल्यानंतर रस्ता, मैदान असे कुठेही बसून पेगवर पेग रिचवणाऱ्या तळीरामांविरोधात वडाळा पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम दारू ढोसत बसणाऱ्या व नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या जवळपास 253 दारुडय़ांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख 3600 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे उघडय़ावर दारू प्यायला बसणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वडाळा परिसरात खुलेआम दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली होती. यामुळे महिला, तरुणींना परिसरातून ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. शिवाय तळीरामांमुळे नको ते प्रकार होण्याचाही धोका वाढला होता. याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनवणे यांनी वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन तळीराम हाती घेतले. त्यानुसार गेल्या एक महिन्यात सार्वजनिक ठिकाणी दारू ढोसणाऱ्या 253 जणांना दणका देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला. यामुळे वडाळ्यातील सार्वजनिक ठिकाणांची तळीरांमाच्या तावडीतून सुटका झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या