कोटय़वधी रुपये खर्चूनही पाणी स्वच्छ होईना ,नगर जिह्यात 533 पाणी नमुने आढळले दूषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोटय़वधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याचेच समोर येत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत जिह्याच्या ग्रामीण भागात घेतलेल्या एकूण पाणी नमुन्यांपैकी 4.36 टक्के नमुने हे दूषित आढळून आले आहेत. ही बाब ग्रामीण भागातील जनतेसाठी धोक्याची आहे. दरम्यान, गत आठ महिन्यांत जिह्यात घेण्यात आलेल्या 12 हजार 226 पाणी नमुन्यांत 533 नमुने दूषित आढळून आलेले आहेत.

 ग्रामीण भागातील जनतेला पुरवठा होणाऱया पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासण्यासाठी गावपातळीवर जलसुरक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे जलसुरक्षक नियमितपणे पाण्याचे नमुने घेऊन प्रत्येक तालुक्याला असणाऱया भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोग शाळेसह पब्लिक हेल्थ लॅबकडे तपासणीसाठी जमा करतात. त्यानंतर येणाऱया तपासणी अहवालाची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सादर करण्यात येते. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, त्या पाण्याचा स्रोत दूषित होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतात. पाणी शुद्धीकरणासाठी नियमित ब्लिचिंग पावडचा वापर करत पाण्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन असल्यास ते पिण्यास योग्य नाही, असे कळवण्यात येते.

 गावपातळीवर पिण्याचे पाणी दूषित होऊ नये, प्रयत्न सुरू असताना दर महिन्याच्या तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून येते. पाणी तपासणीनंतर संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. तरीदेखील जिह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

 ब्लिचिंग पावडरचे 16 नमुने निकृष्ट

 जिल्हा परिषद ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसोबत संबंधित ग्रामपंचायती पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी ब्लिचिंग पावडरदेखील तपासण्यात येते. मागील महिन्यात अशाप्रकारे 399 पावडरचे नमुने तपासण्यात आले. पैकी 16 नमुने निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक निकृष्ट पावडर कर्जत आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी सहा गावांतील आहे. यात गुरवपिंप्री, रमजानचिंचोली, चांदा बु, चांदा खु, तिखी, थेरगाव या कर्जतच्या, तर सोनेवाडी, शहापूर, केतकी, दरेवाडी, निंबोडी, सारोळाबद्दी या नगर तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

 नोव्हेंबरमधील दूषित पाणी असणारी गावे

 अकोले- गुहिरे, कातळपूर, मालेगाव, तेरुंगणा. कोपरगाव- कारवाडी, शिगणापूर, मढी बु. पारनेर- धोत्रे, ढोकी, रुईछत्रपती, नारायण गव्हाण, जातेगाव, गटेवाडी, म्हसोबाझाप. पाथर्डी- शंकरवाडी, शेकटे, खिर्डी, घाटशिरस, कोल्हार, खाडगाव, जावळवाडी, अल्हनवाडी, निपाणीजळगाव. राहाता- हसनपूर, पाथरे बु. राहुरी- कणगर, चांदेगाव, निंभेरे. संगमनेर-वनकुटे, सावरगाव घुले, वरूडीपठार.