
सातारच्या चौकाचौकांत सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, त्या ठिकाणी धूर ओकणाऱया वाहनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरालिसिस) धोका निर्माण झाला आहे.
मागील पाच वर्षांपासून सातारा शहरात वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहने, यामुळे साताऱयात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः शहरातील चांदणी चौक, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, पोवई नाका, राधिका रोड, मार्केट यार्ड, गोडोली नाका, शेटे चौक, शनिवार चौक, एसटी स्टँड परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक हे वाहतूककोंडीचे आणि प्रदूषणाचेही हॉटस्पॉट ठरले आहेत. यातून ध्वनी व वायुप्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे.
वाहतूककोंडीच्या ठिकाणी वाहनातून धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत असून, या धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. नागरिकांना श्वसनाचे विविध आजार मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्याचप्रमाणे प्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरालिसिस) धोका निर्माण झाला आहे. विशेषतः तरुणाईबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना हा धोका अधिक जाणवतो. ध्वनी व वायू प्रदूषणाचे शिकार हे ज्येष्ठ नागरिक होत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. या समस्येवर संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रशासनाने चौकाचौकांतील सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी चिंता
सातारा शहर हे ‘पेन्शनर्स सिटी’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे या शहरात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईबरोबरच ज्येष्ठ नागरिकही वाहनांचा वापर मोठय़ा प्रमाणात करीत असतात. वाढत्या प्रदूषणामुळे ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त असताना त्यांना ध्वनी व वायुप्रदूषणाने होणाऱया आजारांचाही सामना करावा लागत आहे.
मेंदूतील नसांवरही परिणाम
हाय ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल असणाऱया नागरिकांना ध्वनी व वायुप्रदूषणाचा सर्वाधिक धोका जाणवतो. वायुप्रदूषणाचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरालिसीस) धोका उद्भवू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. सायलेंट स्ट्रोकमुळे मेंदूच्या लहान नसांमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे पॅरालिसीसचा धोका अधिक संभवतो. त्याचप्रमाणे हवेतील प्रदूषण कण हे श्वासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात आणि नंतर रक्तप्रवाहाद्वारे ते संपूर्ण शरीरात पसरतात. त्यामुळे ते मेंदूतील नसांनादेखील नुकसान पोहोचवू शकतात, असे न्यूरो सर्जन डॉक्टरांचे मत आहे, असे श्रीरंग काटेकर यांनी सांगितले.
साताऱ्यातील हवा गुणवत्ता, निर्देशक बनले शोपीस
वाहनातून बाहेर पडणारा दूषित वायू किंबहुना हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी व हवा किती स्वच्छ आहे, हे दर्शवण्यासाठी साताऱयात राजवाडा परिसरातील जवाहरलाल नेहरू बाग (गोलबाग) तसेच शाहू स्टेडियमसमोर हुतात्मा चौकानजीक उभारण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशकावर वायुप्रदूषणाची माहितीच उपलब्ध होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. हे उभारलेले फलक सातारकरांसाठी शोपीस बनले आहेत. सध्यातरी या फलकाचा जाहिरात फलक म्हणूनच उपयोग होत असल्याचे दिसून येते.




























































