राष्ट्रीय खेळाडूंच्या जेवणात नखे आणि केस सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय खेळाडूंच्या जेवणात नखं व केस सापडल्याची धक्कादायक घटना पटियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् (एनएस-एनआयएस) येथे घडली. धावपटू हिमा दाससह आणि काही ऍथलिटस्नी याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रीजिजू यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. याची गांभीर्याने दखल घेतल्यानंतर खेळाडूंना देण्यात येणाऱया जेवणात सुधारणा करण्यात आली. एका वृत्तपत्रामधून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.

एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हिमा दास हिने तिच्या जेवणामध्ये नखं सापडल्याचा फोटो एनआयएस व्यवस्थापनाला पाठवला. त्यानंतर याबाबतची तक्रार किरण रीजिजू यांच्याकडेही केली. एवढेच नव्हे, तर काही ऍथलिटस्कडून त्यांच्या जेवणात केस सापडल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. तसेच किचनमधील कर्मचाऱयांना शिंका आल्यास ते आपल्या हाताने नाक पुसतात. व त्यानंतर हात सॅनिटाइज न करता, तसेच न धुता जेवण बनवतात, अशीही तक्रार करण्यात आली होती.

… अन् जाग आली

खेळाडूंकडून तक्रार करण्यात आल्यानंतर साईला जाग आली. त्यानंतर साईचे जनरल डायरेक्टर संदीप प्रधान, सेक्रेटरी रोहित भारद्वाज यांच्यासह इतर अधिकाऱयांनी खेळाडूंशी संपर्क साधला आणि ही समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलले.

जेवणात सुधारणा झालीय – हिमा दास

किचनशी निगडित बाबींबाबत आम्ही समाधानी नव्हतो म्हणून तक्रार केली. पण त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता आम्हाला जे जेवण किंवा नाष्टा देण्यात येतो त्यामध्ये सुधारणा झाली आहे, असे हिमा दास यावेळी म्हणाली.