पोलिसांच्या कारवाईला कोर्टात आव्हान, आरोपी मुलाला बेकायदा कोठडीत ठेवल्याचा आरोप

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईला आव्हान देत आरोपी अल्पवयीन मुलाच्या आत्येने शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुलाला बेकायदा ताब्यात घेऊन सुधारगृहाच्या कोठडीत पाठवले, असा आरोप करीत तिने मुलाची तातडीने सुटका करण्याबाबत विनंती केली. मात्र न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.

आरोपी मुलाची आत्या पूजा जैन हिने ऍड. स्वप्नील अंबुरे यांच्यामार्फत हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी नियमबाह्य पद्धतीने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यामुळे मुलाची तातडीने सुटका करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती ऍड. पोंडा यांनी केली. सरकारतर्फे ऍड. हितेन वेणेगावकर यांनी याचिकेवर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूकडील प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने मुलाच्या सुटकेबाबत तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आणि याचिकेवरील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब केली.