कळव्यातील ओम कृष्णा को-ऑ. हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावरती कोसळून तिघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सदर इमारत 30 ते 35 वर्षे जुनी असून ती इमारत C1 या धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत मोडत आहे.
मनोहर दांडेकर (70) ,मनीषा (65) आणि मयूर (40) असे जखमी झालेल्या एका कुटुंबातील तिघांची नावे असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेनंतर त्या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच इमारत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आल्याने तेथील 30 सदनिकांमधील 90 ते 100 रहिवाशांनी आपआपली राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे केली आहे.
याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने त्या इमारतीला धोकापट्टी लावण्यात आल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
कळवा भुसार आळी येथे तळ अधिक 4 मजली या ओम कृष्ण को-ऑ. हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक -302 मधील हॉलचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 202 मध्ये पडला असून यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजताच घटनास्थळी महापालिका अधिकारी- कर्मचारी , कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून मनोहर यांच्या डाव्या हाताला, मनीषा यांच्या कमरेला व छातीला तर मयूर यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असे सांगण्यात येत आहे.
इमारत आहे C1 वर्गवारीतील…
सदर इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी असून ती C1 या धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत असलेली इमारत आहे. या तळ अधिक चार मजली इमारतीत एकूण 30 सदनिका आहेत. तळ मजल्यावर 7 तर पहिल्या मजल्यावर 5 आणि 2,3,4 या मजल्यांवर प्रत्येकी 6 सदनिका आहेत. अंदाजे 90 ते 100 व्यक्ती राहतात. ती इमारत रिकामी करण्यात आली असून त्या इमारतीला धोकापट्टी लावण्यात आली आहे. तर पुढील कार्यवाही ठामपा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे. असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.