पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून, मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर; 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी

मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून आज जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेली ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 13 मेपासून सुरू करण्यात येत असून 17 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश असलेली ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. विद्यापीठाच्या   https://mu.ac.in/admission या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे. वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाइन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे- 13 मे  ते 3 जून

विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – 9 जून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी – 10 जून संध्याकाळी 6 वाजता

विद्यार्थी तक्रार – 12 जून 2025 पर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत

पहिली गुणवत्ता यादी – 17 जून संध्याकाळी 6 वाजता

ऑनलाईन शुल्क भरणे –  18 जून ते 21 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

द्वितीय गुणवत्ता यादी- 24 जून संध्याकाळी 6 वाजता

ऑनलाईन शुल्क भरणे – 25 जून ते 27 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स – 1 जुलै 2025