प्रज्ञा ठाकूर बेपत्ता झाल्याची पोस्टर झळकली; रुग्णालयात उपचार घेत असल्याची भाजपची माहिती

1498

भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर बेपत्ता झाल्याची पोस्टर भोपाळमध्ये झळकली आहेत. कोरोनासारख्य जागतिक संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे जनता अडचणीत असताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर बेपत्ता असल्याचा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. मात्र, कर्करोग आणि डोळ्यांच्या उपचारासाठी प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात दाखल असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. तसेच त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सूचना देत असल्याचे सांगण्यात आले.

प्रज्ञा ठाकूर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहकार भारतीद्वारे संचालित बैरागड चिंचली भागात एका फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन केले. मात्र, त्यानंतरही खासदार प्रज्ञा ठाकूर बेपत्ता असल्याची पोस्टर शहरात ठिकठिकाणी झळकत आहेत. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या जनतेला आपल्या खासदार कुठे आहेत आणि काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे माजी मंत्री पी.सी. शर्मा यांनी सांगितले. संकटाच्या काळात ठाकूर यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्याची गरज असल्याचे शर्मा म्हणाले.

प्रज्ञा ठाकूर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे. त्यावरून त्या बेपत्ता नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे सहकार भारतीचे पदाधिकारी उमाकांत दिक्षीत यांनी सांगितले. प्रज्ञा ठाकूर सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकूर कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी आणि जनतेची त्या मदत करत असल्याचेही दिक्षीत यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार भोपाळसह त्यांच्या मतदारसंघात जेवणाची पॅकेट आणि धान्य गरजूंपर्यंत पोहचवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मात्र, काहीजण पोस्टरबाजी करत राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्करोग आणि डोळ्यांच्या उपचारासाठी प्रज्ञा ठाकूर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत, असे प्रदेश भाजपचे प्रवक्ते राहुल कोठारी यांनी सांगितले. मध्य प्रदेशात याआधी माजी मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचा मुलगा नकुलनाथ हे बेपत्ता असल्याची पोस्टर छिंदवाडामध्ये झळकली होती. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते ज्योतिरादित्य सिंधिया बेपत्ता असल्याची पोस्टर ग्वाल्हेरमध्ये झळकली होती. त्या नावांमध्ये आता प्रज्ञा ठाकूर यांच्या नावाची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या