
महायुती सरकारला सर्वसामान्य व्हिजिटर्सचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील व्हरांड्यातील कठडय़ांवर शोभेच्या झाडाच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्हिजिटर्सना दोन क्षण निवांत बसण्याची जागाही सरकारने काढून घेतली असल्याची चर्चा आहे.
महायुती सरकार आल्यापासून जिल्हा पातळीवर सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मुंबईसह ग्रामीण भागातून मंत्रालयात येणाऱयांची संख्या वाढली आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी फेशिअल रेकग्निशन सिस्टीम आणून सरकारने सर्वसामान्यांना प्रवेश कठीण केला आहे. पण तरीही रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज असंख्य व्हिजिटर्स मंत्रालयात दररोज येतात. मात्र आता या ठिकाणी कुंड्या ठेवल्याने शासकीय कामासाठी आलेल्या अनेक व्हिजिटर्सनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
मंत्रालयाच्या सहावा मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कार्यालये आहेत. पण मंत्रालयात कधी मुख्यमंत्री नसतात, कधी उपमुख्यमंत्री नसतात तर कधी अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे पंटाळलेले व्हिजिटर्स सहाव्या मजल्यावरच्या व्हरांड्याच्या कठडय़ावर काही मिनिटांसाठी बसतात. पण आता महायुती सरकारने या कठडय़ावरच शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर आलेल्या व्हिजिटर्सची बसण्याची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.



























































