पवई गावात पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला, अतिक्रमण हटवताना संघर्षाला हिंसक वळण

पवई व मौजे तिरंदाज गाव येथे आज पालिकेची बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू असताना पोलीस आणि महापालिका अधिकाऱयांवर हल्ला करण्यात आला. या ठिकाणच्या भूखंडावर सुमारे 500 झोपडय़ा ‘लेबर हटमेंट’ म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आल्या होत्या. मात्र 1 जून रोजी नोटीस बजावूनही या झोपडय़ा हटवण्यात आल्या नसल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली. मात्र अतिक्रमण हटवताना संघर्षाला हिंसक वळण लागले. यामध्ये दगडफेकीत महापालिकेचे 5 अभियंते, मजूर आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर पोलिसांच्या लाठीमारात काही रहिवासीदेखील जखमी झाले.

पवई गाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे 500 इतक्या झोपडय़ा असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आली होती. पवई येथील भूखंडावरील झोपडय़ांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने महानगरपालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 चे कलम 55 नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वीदेखील नोटीस देण्यात आल्या होत्या, असेही पालिकेने स्पष्ट केले. पालिका अधिनियमातील कलम 488 तरतुदीनुसार, या झोपडीधारकांना पालिकेने गेल्या 1 जून 2024 रोजी कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 48 तासांच्या आत स्वतःहून ही अतिक्रमणे निष्कासित न केल्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे या नोटिसीत नमूद करण्यात आले होते, अशी माहिती पालिकेने दिली. मात्र आज कारवाई सुरू करताच रहिवाशांकडून दगडफेक करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

आयुक्तांकडून जखमींची विचारपूस

या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचाऱयांची पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन विचारपूस केली. पालिकेकडून कायद्यानुसार कारवाई केली जात असून महानगरपालिका कर्मचाऱयांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जमावाविरोधात गुन्ह्याची नोंद

या दगडफेकीत एकूण 25 जण जखमी झाल्याची नोंद आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दगडफेकप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी जमावाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पवई पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून पोलीस दगडफेक करणाऱयाचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तणावामुळे स्पेशल फोर्सला पाचारण

तोडक कारवाई सुरू झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे ही घरे आमची हक्काची असल्याचे सांगत रहिवाशांनी कारवाईला विरोध केला. आम्हाला कोर्टात जाण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र पालिकेने कायदेशीर निर्देशानुसारच कारवाई करीत असल्याचे सांगत बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस, पालिका कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली. रहिवाशांनी पोलीस, पालिका कर्मचाऱयांवर दगडफेक सुरू केली, तर पोलिसांनीदेखील लाठीचार्ज केला. या संघर्षाला हिंसक वळण लागल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. यामुळे एसआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि क्विक रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले.

कारवाई सुरूच राहणार

महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली आहे. तर कायद्याचे पालन करून या बेकायदेशीर बांधकामांवर निष्कासन मोहीम यापुढेदेखील सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.