
आखातातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युद्धामुळे आधीच देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा असताना आता पावर पेट्रोल आणि औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळपासून पावर पेट्रोलचे दर २ ते २.३५ रुपये प्रति लिटरने वाढवले आहेत. साध्या पेट्रोलच्या दरात वाढ झालेली नाही.
दुसरीकडे, औद्योगिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला असताना उद्योगांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. पावर पेट्रोलच्या दरवाढीनंतर औद्योगिक डिझेल देखील महागले आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ने (IOC) दरांमध्ये वाढ करत औद्योगिक डिझेलचा दर ₹87.67 प्रति लिटरवरून थेट ₹109.59 प्रति लिटर केला आहे. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे डिझेल सामान्य पेट्रोल पंपांवर विकले जात नाही. याचा थेट पुरवठा मोठे कारखाने, जनरेटर्स, खाण कंपन्या, बांधकाम क्षेत्र आणि पॉवर प्लँट्सना केला जातो. उत्पादन प्रक्रियेत याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने उत्पादनाचा खर्च वाढण्याची भीती आहे. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरता हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. विशेषतः आखाती देशांतील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला असून तेल कंपन्यांचा खर्च वाढला आहे. हिंदुस्थान आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बदलांचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर होत आहे.
औद्योगिक डिझेल महागल्याने अप्रत्यक्षरित्या महागाई वाढू शकते. मालवाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा अंतिम परिणाम वस्तू आणि सेवांच्या किमतींवर होतो, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसू शकते.



























































