बापरे! पीपीई किटची दर दिवसाची किंमत दहा हजार रुपये, खासगी रुग्णालयाकडून लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाग्रस्त रुग्णाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी केल्याप्रकरणी अशोका मार्ग येथील पायोनिअर रुग्णालयाला नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या हॉस्पिटलने रुग्णालकडून एका पीपीई किटची किंमत एका दिवसासाठी तब्बल 10 हजार 500 रुपये इतकी आकारल्याचे समोर आले आहे.

शासनाने खासगी रुग्णालयांना कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचाराचे दर निश्चित करून दिले आहेत. वारंवार आवाहन करूनदेखील काही रुग्णालय अवाजवी बिल आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने 22 लेखापरीक्षक व भरारी पथकांची नियुक्ती करून या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्याचे पाऊल उचलले, तसेच रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू केली. रुग्णालयात जाऊन काही बिलांची तपासणी केली जात आहे.

अशोका मार्ग भागातील पायोनियर हॉस्पिटलने जादा बिलाची आकारणी केल्याबाबतची तक्रार मुख्य लेखापरीक्षकांकडे एका रुग्णाने भ्रमणध्वनीद्वारे केली होती. हॉस्पिटलने या रुग्णाकडून एका पीपीई किटची किंमत एका दिवसासाठी तब्बल 10 हजार 500 रुपये इतकी आकारलेली आहे. रुग्णावर दहा दिवसच उपचार सुरू असताना कन्सल्टींग चार्जेस पंधरा दिवसांचे लावले आहेत. याबाबत रुग्णाचे बिल व संबंधित कागदपत्रे कार्यालयात सादर करण्यास कळवले तरीही त्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे यांनी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.