‘ती’जमीन दाऊदच्या हस्तकाची आहे, हे माहीत नव्हते – प्रफुल्ल पटेल

1453

मनी लॉन्डरिंग प्रकरणात गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीने 12 तास चौकशी केली. या चौकशीत पुनर्विकास केलेली जमीन ही इकबाल मेमन ऊर्फ इकबाल मिर्ची या दाऊदच्या हस्तकाची आहे, हे माहीत नव्हते, अशी माहिती पटेल यांनी ईडीला दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या बांधकाम कंपनीने वरळीत बांधलेल्या इमारतीचा मालक दाऊदचा हस्तक इकबाल मिर्ची असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्या संदर्भात पटेल यांची चौकशी केली. चौकशीत इकबाल मेमनच्या पत्नीबरोबर सगळा व्यवहार केला. त्यावेळी ती दाऊदचा हस्तक इकबाल मिर्चीची पत्नी आहे, हे माहीत नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.

मिर्ची कुटुंबाकडून 5 कोटी का घेतले?

ईडीने पटेल आणि मिर्चीच्या पत्नीबरोबर झालेल्या जमीन व्यवहाराची चौकशी केली. त्याबरोबर मिर्चीची पत्नी हाजरा आणि तिच्या मुलांकडून 5 कोटी रुपये का घेतले, याची चौकशी केली. इमारतीच्या देखरेखीसाठी ही रक्कम आपल्या कंपनीने घेतली असे पटेल यांनी ईडीला सांगितले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि मिर्चीला ओळखणाऱया एका मित्राच्या फोनवरून मिर्चीबरोबर झालेल्या फोन संभाषणाची ईडी चौकशी करत आहे.
फारुख पटेलने केली मध्यस्थी

इकबाल मिर्चीने वरळीतील एका जमिनीवर 1985 साली बेकायदेशीरपणे कब्जा केला. यातील जमिनीचा काही भाग फारुख पटेल याचा होता. या जमिनीवर मिर्चीने डिस्को सुरू करून अंमलीपदार्थांचा व्यापार सुरू केला. मिर्ची नंतर अटकेच्या भीतीने परदेशात पळाला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने 1999 साली मिर्चीच्या पत्नीबरोबर फारुखच्या मध्यस्थीने पुनर्विकासाचा करार केला. कंपनीने तिथे ‘सीजे’ नावाची इमारत उभारली. या सगळय़ा प्रकरणात फारुख पटेल याने मध्यस्थीचा व्यवहार केला.

आपली प्रतिक्रिया द्या