
>> प्रसाद ताम्हनकर
जगभरात गुन्हेगारांकडून गुन्हे करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात असतात, तंत्रज्ञानाचा वापरदेखील केला जात असतो. पोलीसदेखील अत्यंत हुशारीने अशा गुह्यांचा माग काढत असतात. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा पोलीसदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने गुन्हेगारांचा माग काढणे पूर्वीपेक्षा थोडे जास्त सोपे झाले आहे. मोबाईल नंबरचा माग काढणे, कॉल रेकॉर्डिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरे, फेस रेकग्नेशन अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर आता गुह्याची उकल करण्यासाठी उपयोगी पडू लागला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील कलबुर्गी शहरात पोलिसांनी अशाच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपींना मुद्देमालासकट पकडण्यात यश मिळवले.
मुथुल्ला मलिक हे कलबुर्गी शहरातील एक सोन्याचे व्यापारी. सोन्याचे दागिने बनवणे तसेच तयार दागिन्यांची पी करणे हा त्यांचा व्यवसाय. या मलिक साहेबांकडे दिवसाढवळ्या दरोडा पडला आणि 850 ग्राम सोने दरोडेखोरांनी लुटून नेले. मलिक साहेबांनी तातडीने पोलिसांकडे पार दाखल केली. गुह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली आणि पोलिसांची पाच पथके एकाच वेळी या गुन्हेगारांच्या मागावर निघाली. त्यातील एका पथकाने मुथुल्ला मलिक यांची साक्ष नोंदवायला घेतली तर इतर पथके परिसरातील सीसीटीव्ही तपासणे आणि गुन्हेगारांचा माग काढणे यावर लक्ष केंद्रित करायला लागली.
मलिक यांनी दिलेल्या साक्षीनुसार चार दरोडेखोर अचानक त्यांच्या दुकानात घुसले. ओळख लपवण्यासाठी सर्वांनी आपले चेहरे झाकलेले होते. त्यांच्याकडे छोटे बंदुकीसारखे शस्त्र होते जे त्यांनी मलिक ह्यांच्यावर रोखून धरले. सर्वात आधी एकाने त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱयाची वायर कापली. इतरांनी दोरीने मुथुल्ला मलिक यांचे हातपाय बांधले आणि त्यांना तिजोरीची किल्ली देण्यासाठी दरडावले. घाबरलेल्या मलिक यांनी त्यांना किल्ली दिली. दरोडेखोरांनी ताबडतोब तिजोरी उघडली आणि आतले सर्व सोने घेऊन पोबारा केला.
मलिक यांची साक्ष घेतल्यावर पोलीस थोडे पावले; कारण पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱयाचे चित्रीकरण तपासले होते, तेव्हा मलिक यांच्या दुकानाबाहेर पाच लोक उभे असल्याचे दिसत होते. मलिक यांच्या साक्षीनुसार चार लोक दुकानात घुसले होते. म्हणजे एक जण बाहेर उभा राहून पाळत ठेवत होता हे निश्चित झाले. आता पोलिसांनी पाच अज्ञात लोकांवर गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. परिसरातील मोबाईल टॉवर्स आणि मोबाईल लोकेशन्सचा तपास जोमाने करण्यात आला. मात्र पाच आरोपींपैकी चौघांनी आपले मोबाईल फेकून दिले होते आणि पाचव्याचा मोबाईल पोलीस पथकाला ट्रेस होत नव्हता.
पोलिसांच्या दुसऱया पथकाने आपले लक्ष सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या चित्रीकरणावर केंद्रित केले होते. त्यांनी मुथुल्ला मलिक यांच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या सोबत परिसरातील अनेक सीसीटीव्हींचे चित्रीकरण तपासायला सुरुवात केली. काम वेळखाऊ आणि किचकट होते. पण पोलिसांनी हार मानली नाही. शेवटी पोलिसांच्या कष्टाला यश आले आणि दरोडय़ाच्या वेळी दुकानाबाहेर पाळत ठेवत असलेला इसम एका पावभाजीच्या दुकानात खरेदी करताना दिसून आला. पोलिसांनी त्वरेने ते दुकान गाठले. सदर गुन्हेगाराने तिथे खरेदी करताना पैसे देण्यासाठी ळझ्घ् चा वापर केलेला होता, त्यामुळे पोलिसांच्या हाताला त्याचा मोबाईल नंबर लागला आणि मग त्याला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घ्यायला पोलिसांना वेळ लागला नाही.
दरोडय़ाच्या बेत आखणारा स्वत एक व्यापारी असून त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज झाल्याने त्याने दुसऱया एका सोनाराला लुटण्याचा डाव आखला होता. त्यासाठी त्याने अजून चार लोकांना मदतीसाठी घेतले होते. मात्र या तपासात पोलिसांना मोठा आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा गुन्हेगारांकडे 2 किलो 850 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी जेव्हा मुथुल्ला मलिककडे योग्य भाषेत विचारपूस केली तेव्हा ते सर्व सोने आपलेच असल्याची कबुली दिली. दोन किलो सोने बेहिशेबी असल्याने त्याने फक्त 850 ग्रॅम सोने चोरीला गेल्याची पार दाखल केली होती. त्याच्या कबुलीनंतर आता पोलिसांनी त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल केलेला आहे.