साय-फाय – किशोरावस्था आणि सोशल मीडियाचा प्रभाव

>> प्रसाद ताम्हनकर

सोशल मीडियाचा किशोरावस्थेतील मुलांवर पडणारा प्रभाव चांगला आहे की वाईट आहे, या मुद्दय़ावरील चर्चेने सध्या पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे. या चर्चेसाठी कारण ठरल्या आहेत त्या कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री मा. लक्ष्मी हेब्बलकर. विधानसभेत एका चर्चेवरील उत्तरात त्यांनी गेल्या तीन वर्षांत वाढलेल्या किशोरावस्थेतील गर्भधारणांच्या समस्येमागे एक कारण सोशल मीडियादेखील असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानाला काही समजधुरिणांनीदेखील सहमती दर्शविली आहे. बालविवाह, बदलती कुटुंब व्यवस्था, परिवारातले ताणतणाव, किशोरवयातील प्रेमप्रकरणे या जोडीला सोशल मीडियाचा प्रभावदेखील एक कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

किशोरावस्थेत होत असलेला मीडियाचा अतिवापर हा मुलांच्या शरीराबरोबरच मनावरदेखील परिणाम करत असल्याचे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. हे परिणाम कधी चांगले होतात, तर कधी वाईट. सोशल मीडियाची नकारात्मक बाजू मांडताना काही अभ्यासकांनी सोशल मीडियाच्या अतिवापराने किशोरावस्थेतील मुलांना काय समस्या येतात, यासंदर्भात सविस्तर मत मांडले आहे. सोशल मीडियावर अनेकदा या मुलांना सायबर बुलिंग अर्थात थट्टा आणि टवाळीला सामोरे जावे लागते. दुसऱया सुखवस्तू मुलांच्या आलिशान जगण्याबरोबर कळत नकळत स्वतःच्या साध्या आयुष्याची तुलना करण्याची सवय लागते. बऱयाचदा स्वतःच्या रंग आणि रूपाची तुलनादेखील इतरांबरोबर केली जाते आणि या सर्वांमुळे नैराश्य, चिंता अशा रोगांची कळत नकळत लागण होते.

1500 किशोरांच्या एका गटावर केलेल्या अभ्यासानुसार त्यातील निम्मे किशोर हे अभ्यासासाठी, काही माहिती अथवा सल्ले मिळवण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांशी जोडलेल्या राहण्यासाठी आणि एकटेपणा कमी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होते. 43 टक्के किशोरांनी कबूल केले की, ते जेव्हा चिंतेत अथवा नैराश्यात असतात तेव्हा ते सोशल मीडियाकडे धाव घेतात आणि त्याच्या वापराने त्यांना बरे वाटते अथवा मनाला शांती मिळते. या गटामध्ये काही समुदायातील किशोरांचादेखील समावेश होता आणि त्यांनी प्रामुख्याने एकटेपणा दूर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे नमूद केले.

दुसऱया एका अभ्यासानुसार जे तरुण सातत्याने सोशल मीडियाचा वापर करतात, ज्यांचा क्रीन टाइम हा इतरांपेक्षा जास्त आहे अशा तरुणांमध्ये नैराश्य, चिंता, एकटेपणा या समस्या मोठय़ा प्रमाणावर आढळून आल्या. उलट जे तरुण फिरायला जाणे, मैदानावर जास्त वेळ घालवणे, मित्रांशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे, पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करणे अशा गोष्टींना जास्त वेळ देत होते त्यांच्यामध्ये चिंता, एकटेपणा आणि नैराश्य या समस्या अतिशय कमी प्रमाणात आढळून आल्या. या तरुणांना संवाद साधणे, अभ्यास करणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अशा गोष्टी सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱया तरुणांपेक्षा जास्त सुलभ प्रकारे करणे शक्य झाले.

सोशल मीडियावर सहजपणे उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य हा सर्वात चिंताजनक प्रकार असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. उत्तेजित करणाऱ्या रील्स, अपुऱ्या वस्त्रातील स्त्रियांचे फोटो किशोरावस्थेतील मुलांना फार लवकर उद्दीपित करतात. चिंतेची गोष्ट म्हणजे हे सर्व साहित्य अपुऱ्या आणि चुकीच्या ज्ञानावर आधारित असल्याने ते किशोर वयातील मुलांना चुकीचे ज्ञान पुरवत असते. मुलामुलींनी जोडीने बनवलेल्या रील्स, हातात हात घालत बनवलेले गाण्यांचे व्हिडीओ हे आपल्यालादेखील एक जोडीदार असायलाच हवा अशा प्रकारची विचित्र कल्पना मनात रुजवायला कारणीभूत होत असतात.

सोशल मीडियावर विविध व्यसनांचे, मुख्यत हुक्का, दारू इ. होत असलेले उदात्तीकरणदेखील एक समस्या बनलेले आहे. कळत नकळत हे किशोर तिकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहेत. या किशोरांचे नैराश्य अथवा त्यांचे एकूण वर्तन यांचा समाजाच्या स्वास्थ्यावरदेखील परिणाम होत असतो याकडेदेखील काही तज्ञ लक्ष वेधतात. पुढच्या पिढीला आपण काय आदर्श देत आहोत, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे हे नक्की!

[email protected]