>> प्रसाद ताम्हनकर
गुगल जेव्हा अस्तित्वात नव्हते, तेव्हा लोक इंटरनेटवर एखादी गोष्ट कशी शोधत असतील हा प्रश्न कधी पडला आहे? आज गुगलने इंटरनेट विश्वात इतके हातपाय पसरले आहेत की, हा प्रश्नदेखील लोकांना कधी पडत नाही. रोज जगभरात अब्जावधी प्रश्न गुगल सर्च इंजिनवर विचारले जातात, करोडो गोष्टी शोधल्या जातात. गुगल आज जगातल्या सर्वात मोठय़ा पंपन्यांपैकी एक पंपनी बनलेली आहे. सुरुवातीपासून काही तत्त्वे पाळणारी, नीती नियमांना महत्त्व देणारी पंपनी असे आपले चित्र गुगलने जगासमोर ठेवले होते. मात्र गुगलचे हे वर्चस्व आता इतर सर्च इंजिन बनवणाऱया पंपन्यांच्या अस्तित्वावर घाला घालू लागल्याची टिप्पणी अमेरिकेतील एका न्यायालयाने नुकतीच केली आहे. गुगल तिच्या प्रचंड सामर्थ्याचा दुरुपयोग करीत आहे आणि त्यामुळे इतर पंपन्यांना आपले अस्तित्व टिकवणेदेखील अवघड झाले आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर गुगल पुन्हा एकदा तिच्या राक्षसी मनोवृत्तीसाठी चर्चेत आली आहे.
जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांनी आज यशाच्या शिखरावर नेऊन बसवलेल्या गुगल सर्च इंजिनला एकेकाळी कोणी विचारतदेखील नव्हते. विकत घेणे सोडा या इंजिनमध्ये कोणी गुंतवणूकदेखील करायला तयार नव्हते. गुगलपूर्वी अल्टाविस्ता सर्च आणि याहू सर्च असे दोन पर्याय इंटरनेटवर उपलब्ध होते. यावर एखादी गोष्ट शोधण्यासाठी प्रचंड वेळ लागायचा आणि मुख्य म्हणजे यात पर्यायांबरोबर जाहिरातीदेखील सामील असायच्या. त्यामुळे आपल्याला हवा असलेला पर्याय कोणता आणि जाहिरात कोणती हे शोधण्यातदेखील खूप वेळ जायचा. त्या वेळी स्टॅनपर्ह्ड महाविद्यालयात पीएचडी करत असलेल्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी त्याला पर्याय म्हणून गुगल सर्च इंजिन बनवले.
सर्च इंजिनमध्ये दिसणाऱया जाहिरातींना या दोघांचा विशेष विरोध होता. त्यामुळे जाहिराती टाळून त्यांनी शोध पर्याय दाखवायला सुरुवात केली. यापूर्वी कोणत्याही सर्च इंजिनने केलेली एक गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शोध पर्यायात दाखवल्या जाणाऱया वेब पेजेसला त्यांच्या महत्त्वानुसार श्रेणी प्रदान केली. यामुळे महत्त्वाची आणि उपयोगाची वेब पेजेस ही वरच्या क्रमवारीत दिसू लागली व शोधकर्त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ वाचू लागला. या वेळी पंपनी उघडणे अथवा गुगलचा व्यावसायिक हेतूसाठी वापर करणे असा त्यांचा कोणताही उद्देश्य नव्हता. ते जिथे शिकत होते, त्याच स्टॅनपर्ह्ड महाविद्यालयाला हे सर्च इंजिन विकायचे आणि पीएचडी पूर्ण करायची असा त्यांचा मानस होता.
गुगल सर्च इंजिनचे महत्त्व या दोघांना कळले असले तरी इतर कोणी ते विकत घेण्यास इच्छुक नव्हते. त्या काळात सर्च इंजिन फारसे काही महत्त्वाचे साधन आहे असे कोणाला वाटत नव्हते. याहूसारख्या पंपनीनेदेखील ते विकत घेण्यास नकार दर्शवला. क्लीनर पार्किन्स, सन मायक्रोसिस्टिम अशा काहींनी मात्र गुगलचे महत्त्व जाणून त्यात छोटी छोटी गुंतवणूक केली. मात्र ती पुरेशी नव्हती. आता एकदा व्यवसाय करायचा ठरवल्यावर पैसा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. शेवटी ज्या गोष्टीला त्यांचा सर्वात जास्ती विरोध होता तीच गोष्ट त्यांना पैसा उभारण्यासाठी स्वीकारायला लागली आणि ती म्हणजे जाहिराती. यावर पर्याय म्हणून मग गुगलवर एक निळी रेषा अस्तित्वात आली. या रेषेच्या एका बाजूला शोधलेले पर्याय असत आणि एका बाजूला जाहिराती असे वर्गीकरण करण्यात आले.
एकदा जाहिराती स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर गुगलने पुन्हा मागे वळून पाहिले नाही आणि अब्जावधी डॉलर्सचे एक साम्राज्य उभे राहिले. गुगल निव्वळ जाहिरातीच्या माध्यमातून आज दरवर्षी 200 अब्ज डॉलर्स कमावते आहे. गुगलचा विस्तार आज सर्च इंजिनच्या पलीकडे पोहोचला आहे. नैतिकता या एका मूळ तत्त्वावर उभी राहिलेली गुगल आज त्या तत्त्वापासून शेकडो मैल लांब गेली आहे, असा आरोप इंटरनेट क्षेत्रात आता वारंवार केला जाऊ लागला आहे. अनेक ठिकाणी गुगलला कायद्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र निर्ढावलेल्या गुगलवर आता नियंत्रण शक्य नाही असा स्पष्ट दावा काही तज्ञ करत आहेत.