ठसा : निर्मलदादा

44

>>प्रशांत गौतम<<

पक्षीमित्र, निसर्गमित्र अशी ओळख लाभलेले निर्मलदादा ठाकूरदास ग्यानानी हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तर होतेच, शिवाय संभाजीनगरातील मुकुल मंदिर या शाळेचे संस्थापकही होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  84 वर्षांचा हा तरुण सदैव मुलाफुलांत रमणारा होता. निर्मलदादांच्या निधनाने स्काऊट-गाईड चळवळीचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत शैक्षणिक क्षेत्रात समर्पित वृत्तीने सदैव कार्यमग्न असणारे व्यक्तिमत्त्व लोप पावले आहे. आईप्रमाणेच देहदान करून समाजाप्रति वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. 27 ऑक्टोबर 1934 साली कराची येथे त्यांचा जन्म झाला. दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. तो काळ हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीचा होता. दंगलीचे वातावरण होते. अशा वातावरणात आई कृष्णामाईंसोबत 1947 साली ते पुण्यात आले. सेवा सदनचा आसरा मिळाला. पुण्यातील नारायणगाव येथे प्राचार्य राजाराम सबनीस यांच्या पुढाकाराने त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. एवढेच नव्हे तर शिक्षण पूर्ण झाल्यावर उरळी कांचन येथे शिक्षकाची नोकरीही मिळाली. निर्मलदादा 1971 च्या सुमारास स्काऊट-गाईड चळवळीच्या निमित्ताने मराठवाड्यात आले. संभाजीनगर शहराचे तत्कालीन आयुक्त रा. गो. साळवी यांच्यासारख्या गुणग्राहक व्यक्तीने निर्मलदादांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण हेरले आणि दादांना मराठवाड्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. दादांनी सात वर्षे अथक परिश्रम घेऊन स्काऊट-गाईडची चळवळ वाढवली. 1977 च्या सुमारास राजीनामा देऊन ते बाहेर पडले. त्यानंतरच्या काळात हिंदी भवन, जिजामाता शाळेत नोकरी केली. 4 सप्टेंबर 1971 च्या सुमारास विद्यार्थी मंडळाची स्थापना केली. त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संख्या वाढत गेली. विद्यार्थी मंडळाला मुकुल मंदिर असे नाव मिळाले. त्यानंतर समर्थनगर, लेबर कॉलनी असा प्रवास करीत शेवटी सिडकोत 1976 च्या सुमारास ही शाळा स्थलांतरित झाली. या शाळेच्या जडणघडणीत निर्मलदादांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहे. त्यांच्या या समर्पित वृत्तीतूनच आज ही शाळा दहावीपर्यंत असून दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निर्मलदादा म्हणजे शिस्तीचा मानदंड. शिस्तप्रिय वातावरणात जे विद्यार्थी शिकले ते पुढील काळात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नावारूपास आले. असे विद्यार्थी घडविणारे दादा तर दिवसभरात 17 तास काम करायचे. त्यांचे सतत कामात व्यस्त असणे ही मुळी अनेकांसाठी प्रेरणा होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक लहान मूल हे सदैव दडलेले असायचे. काही दिवसांपासून निर्मलदादा आजारीच होते. ‘‘आईने ज्या पद्धतीने देहदान केले, त्याचप्रमाणे माझेही देहदान करा. माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका’’ अशी शेवटची इच्छा त्यांनी बंधू उत्तमभाई यांच्याकडे व्यक्त केली होती. ती त्यांनी प्रत्यक्ष कृतीतही आणली. निर्मलदादांनी आपला वाढदिवस कधीही थाटामाटात साजरा केला नाही. माझ्या वाढदिवसाला महागडी वस्तू देण्याऐवजी स्वच्छतेसाठी खराटे द्या, असे ते म्हणत असत आणि अशी भेट मिळाल्यावर ते स्वतःच शाळेचा परिसर चकाचक करीत असत. निर्मलदादांचे स्काऊट-गाईड चळवळ आणि शिक्षण क्षेत्रात असलेले भरीव योगदान लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार, शासनाचा स्काऊट जीवनगौरव आणि मुंबईच्या भारतीय शिक्षण मंडळाचा जीवनगौरव अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. 1971 च्या सुमारास निर्मलदादा मराठवाड्यात आले आणि शेवटपर्यंत मराठवाडा परिसरातच रमले. त्यांचे शहराशी वेगळे नाते निर्माण झाले होते. नवी पिढी घडविणारे ते आधुनिक काळातील साने गुरुजीच होते. आवड, आंतरिक ओढ आणि सर्व उपलब्धतेचा त्याग करून निर्मलदादा यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता. शिक्षणातून संस्काराचा ध्वज त्यांनी खांद्यावर घेतला होता. आज असे शिक्षक अपवादानेच सापडतात. त्यांचे शैक्षणिक कार्य, निसर्ग आणि पक्ष्यांविषयीचे प्रेम, आस्था ही अधोरेखित करावी अशी बाब होय. अशा या अद्भुत व्यक्तिमत्त्वाची एक नवलकथाच आहे, जिचा प्रवास आता संपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या