
निवडणूक आयोगाच्या आदेशाला हरताळ फासून एकाही उमेदवाराला पूर्वकल्पना न देता वानवडी प्रभाग क्रमांक 18 मध्ये चोरी-छुप्या पद्धतीने ईव्हीएम मशीन आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे वानवडी येथील उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले असून, निवडणूक प्रक्रिया हॅक केली जात असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
याबाबत पुणे महापालिका मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकाऱयांना निवेदन दिले असून, गेल्या 24 तासांतील सीसीटीव्ही फुटेज आणि ईव्हीएम मशीन प्रभागात कशा आल्या, याची माहिती मागितली आहे, असे प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रियांमध्ये ईव्हीएम मशीन शहरात पिंवा मतदार संघात दाखल होताना त्याबाबत सर्व उमेदवारांना पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे. ईव्हीएम सील आहे का?, मशीनची बॅटरी खराब आहे का?, बॅटरी पूर्णपणे कार्यरत आहे का? याची तपासणी सर्व उमेदवारांच्या पुढे करूनच हे मशीन स्ट्राँग रूममध्ये सील केले जाते. तसेच, मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवार पिंवा त्यांचे प्रतिनिधींच्या समोर या ईव्हीएमचे सील उघडण्यात येते. असे असताना प्रभाग क्रमांक 18 मध्ये उमेदवारांना पूर्वकल्पना न देता ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांपासून तेथे चोरी-छुप्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया संशयास्पद वाटू लागली आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मधील स्ट्राँगरूममधील गेल्या 24 तासांतील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. जर सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला पिंवा फुटेजमध्ये काही संशयास्पद आढळल्यास न्यायालयात धाव घेणार आहे, असा इशारा जगताप यांनी दिला.
पुणेकरांची फसवणूक करू नका
उमेदवारांच भवितव्य हे पुणेकरांच्या हातामध्ये आहे. योग्य उमेदवाराला निवडून देण्याचे काम पुणेकर करतील. मात्र, भाजपने चुकीच्या पद्धतीने मशीनमध्ये गडबड करून फसवणूक करू नये. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करावे, असेही जगताप म्हणाले.





























































