
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला सपाटूम मार खावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची दशा आणि दिशा ठरवणारे प्रशांत किशोर यांच्यावर काँग्रेसवाले प्रचंड नाराज आहेत. कारण त्यांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं घडत असताना दुसरीकडे प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्येच जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवाल्यांच्या पोटात गोळा आलाय. अर्थात सध्या ही चर्चा आहे, आणि या चर्चेला काँग्रेसने ना नकार दिलाय ना होकार दिलाय.
असं सांगितलं जातंय की १५ दिवसात प्रशांत किशोर काँग्रेसवासी होतील. त्यांना पक्षप्रवेशानंतर थेट काँग्रेसच्या कोअर कमिटीत स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर प्रशांत किशोर गायब झालेत. त्यांना शोधून देणाऱ्यास ५ लाखांचं बक्षिस उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केलं आहे. मात्र काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी या स्थानिक नेत्यांना बोचकारत किशोर यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. किशोर यांनी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये काँग्रेससाठी निवडणुकीची रणनिती तयार केली होती. पंजाबमध्ये काँग्रेसला विजय मिळाला तर उत्तर प्रदेशात काँग्रेसने सपाटून मार खाल्ला.

























































