नांदेडचे पलटूराम! अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला नाही! प्रताप पाटील चिखलीकर यांनी टोपी फिरवली

संपूर्ण जिल्हय़ात धन्यवाद सभा घेऊन पराभवाचे खापर अशोक चव्हाणांवर फोडणाऱ्या प्रताप पाटील-चिखलीकर यांनी अचानक पलटी मारली असून आपला पराभव मनोज जरांगे, मुस्लिम आणि घटना बदलाच्या अफवेमुळे झाल्याचे म्हटले आहे. अशोक चव्हाण हे तर आमचे नेते असून त्यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा लढवणार असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड लोकसभेत तीन खासदार, चार आमदार असूनही भाजपचा उमेदवार चारीमुंडय़ा चित झाला. अशोक चव्हाण यांनी ऐन वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये मारलेली उडी चिखलीकरांसाठी धोक्याची ठरली. चव्हाणांचा भाजप प्रवेश नांदेडकरांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे नांदेडकरांनी ठरवून काँग्रेसच्या पारडय़ात आपले वजन टाकले. परंतु हा पराभव भाजपच्या अजूनही गळी उतरलेला नाही. प्रताप चिखलीकरांनी जिल्हाभरात धन्यवाद सभा घेऊन आपल्या पराभवासाठी अशोक चव्हाणांनाच जबाबदार ठरवले. बेइमानांना सोडणार नाही, अशी गर्जनाही त्यांनी केली.

z प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केलेल्या आरोपांमुळे बेचैन झालेल्या अशोक चव्हाणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले गाऱहाणे नेले. लोकांनी मला मतदारसंघात फिरू दिले नाही. त्यात संपूर्ण देशभरातच मुस्लिम मते काँग्रेसकडे वळली. नांदेडातही तेच झाले. त्यामुळे चिखलीकरांच्या पराभवासाठी मी जबाबदार कसा? अशी पैफियत चव्हाणांनी मांडली.