कळंबोलीतील विवाहितेची प्रतापगडाच्या कडेलोट पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । प्रतापगड

किल्ले प्रतापगडावरील प्रसिद्ध कडेलोट पॉइंटवरून दरीत उडी मारून ज्योती नवनीत बल्लाळ (वय 31, रा. कळंबोली, मुंबई) या विवाहितेने आज आत्महत्या केली. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना सायंकाळी मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या केलेला कडेलोट पॉइंट हा सातारा जिह्यात येत असून, ज्या दरीत महिलेचा मृतदेह होता ती दरी व हद्द रायगड जिह्यात येत असल्याने, हद्दीच्या वादामुळे ट्रेकर्सचे जवान मृतदेहापर्यंत पोहोचूनदेखील त्यांना तो वरती काढण्यास काही तास विलंब लागला. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, तिच्या पर्समध्ये सिमकार्ड नसलेला मोबाईल, आधार कार्ड व ओळखपत्र तसेच एक व्हिजिटिंग कार्ड मिळाले. या माहितीवरून महिलेची ओळख पटली.  पर्समध्ये असलेल्या व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल नंबरवर पोलिसांनी संपर्क साधला असता तो महिलेच्या पतीचा असल्याचे उघड झाले व तो मध्य प्रदेश येथे असल्याचे समजले. प्रतापगडवासीयांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. ट्रेकर्स दोराच्या सहाय्याने उतरून मृतदेहापर्यंत पोहोचले.