निमित्त – सर्वसामर्थ्याची पाच तत्त्वे

>>प्रतिक राजूरकर

4 डिसेंबर रोजी हिंदुस्थान नौदल दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचा नौदल दिवस हा 1971 सालच्या पाकिस्तानवरील विजयाचे 51 वे वर्ष आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली आणि पाकिस्तानवरील विजयाची 50 वर्षे हा अभिमानास्पद योगायोग आहे.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी हिंदुस्थान नौदल दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. 1971 सालच्या पाकिस्तानविरुद्ध युद्धात हिंदुस्थानी नौदलाने 4 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या चार युद्धनौकांना जलसमाधी दिली होती. कराची बंदरावरील हल्ला आणि विशाखापट्टणम येथील पाकिस्तानचा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानी नौदलाने ट्रायडेंट मोहिमेची यशस्वी सांगता करत पाकिस्तानला पाणी पाजले होते. हिंदुस्थानी नौदलाच्या या देदीप्यमान पराक्रमाची आठवण म्हणून मोठय़ा उत्साहात हिंदुस्थानात 4 डिसेंबर हा दिवस नौदलाला समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानी नौदलाचे प्रेरणास्थान मानले जातात. ‘शं नो वरुण’ हे हिंदुस्थानी नौदलाचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच जल देवता अशी मान्यता असलेले वरुण देव आमच्यासाठी शुभ असोत. यंदाचा नौदल दिवस हा 1971 सालच्या पाकिस्तानवरील विजयाचे 51 वे वर्ष आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली आणि पाकिस्तानवरील विजयाची 50 वर्षे हा अभिमानास्पद योगायोग आहे.

ऑपरेशन ट्रायडेंट

1971 सालच्या पाकिस्तान युद्धापूर्वी तत्कालीन नौदलप्रमुख सरदारलाल मथरादास नंदा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट संकेत दिले होते की, जर पाकिस्तानसमवेत युद्ध झाल्यास हिंदुस्थानी नौदल कराची बंदर घेईल इतकी हिंदुस्थानी नौदलाची क्षमता आहे. 3 डिसेंबर 1971 च्या रात्री पाकिस्तान वायुदलाने हिंदुस्थानवर हल्ला केला. इंदिरा गांधींनी राष्ट्राला संबोधित केले. हिंदुस्थानी नौदलाच्या युद्धनौका या कराचीपासून 150 किमी दूरवर 3 डिसेंबर रोजी दक्ष होत्या. 4 डिसेंबरच्या रात्री हिंदुस्थानी नौदलास पाकिस्तान सैन्याकडून हालचाल जाणवली. हिंदुस्थानी नौदलाने मिसाईलने लक्ष्यावर हल्ला केला आणि क्षणार्धात पाकिस्तानी युद्धनौका पीएनएस खैबर नेस्तनाबूत झाली. हिंदुस्थानी नौदलाने प्रतिकार सुरू केला. प्रतिकारात पाकिस्तानी व्यापारी जहाज विनस चॅलेंजर, पीएनएस शाहजान ही युद्धनौका बेचिराख झाली. हिंदुस्थानी युद्धनौकांनी पाकिस्तानची चौथी सुरुंगनाशक नौका पीएनएस मुहाफिज बुडवण्यात यश प्राप्त केले. समुद्रातील पाकिस्तानी अडथळे नेस्तनाबूत करत हिंदुस्थानी युद्धनौका विनाश, त्रिशूळ, तलवार यांनी कराचीकडे प्रस्थान केले. हिंदुस्थानी युद्धनौकांनी कराची बंदरात नजीकच्या कियामरी तेल केंद्रावर क्षेपणास्त्र्ा टाकत अखेरचा हात फिरवला. लागलीच हिंदुस्थान नौदलाने हिंदुस्थानला वरिष्ठांना सांकेतिक भाषेत निरोप दिला, ‘चार कबुतरं आपल्या घरटय़ात आनंदाने विसावली आहेत.’ त्यावर उत्स्फूर्तपणे हिंदुस्थानकडून नौदलाला प्रतिक्रिया आली, ‘यासारखी दिवाळी आम्ही आजवर बघितलेली नव्हती.’ हिंदुस्थानी नौदलाच्या पराक्रमाची, यशाची, शौर्याची दिवाळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानने साजरी केली. 1965 च्या युद्धात आंतरराष्ट्रीय अडचणी कायदे यामुळे हिंदुस्थानी नौदलास हिंदुस्थानच्या सागरी सीमा ओलांडता आल्या नव्हत्या. 1971 साली इंदिरा गांधींनी नौदलप्रमुखांना मोकळा हात दिल्याने अटकेपार नौदलाने आपल्या पराक्रमाची पताका लावत अभिमानास्पद कामगिरी केली. हिंदुस्थानी पराक्रमाला सीमा नसते हे हिंदुस्थानी नौदलाने जगाला त्या दिवशी दाखवून दिले. नौदल दिवस साजरा करण्यासाठी यापेक्षा मोठा दिवस असू शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव

सप्टेंबर 2022 साली हिंदुस्थानी नौदलाचा झेंडा आणि नवीन बोधचिन्ह पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झाले. एका बाजूला राष्ट्रध्वज असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या संकल्पनेतून हे बोधचिन्ह निर्माण झाले आहे. एका अष्टकोनी ढालीवर हे चिन्ह असून त्यावर देशाची राजमुद्रा, नांगरसदृश्य जहाजाचे चित्र असून नौदलाचे ब्रीदवाक्याचा उल्लेख आढळतो. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे राष्ट्राला समर्पित करण्याच्या सोहळय़ात नौदलाच्या झेंडय़ाचे आणि बोधचिन्हाचे अनावर करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानच्या नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मान्यता आहे. हिंदुस्थानला आपल्या दूरदृष्टीने सशक्त आरमार, नौदलाची स्थापना करून शिवरायांनी आदर्श घालून दिला. छत्रपतींचा गनिमी कावा आणि नौदल हे हिंदुस्थानी लष्कराचे सामर्थ्य आहे. स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांतचे निर्माण कार्य 1999 सालापासून सुरू झाले होते. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होत राष्ट्र सेवेत येण्यास 2022 साल उजाडले. आज हिंदुस्थानी नौदलात विक्रमादित्य आणि विक्रांत अशा दोन विमान वाहक विशाल युद्धनौका आहेत. इंडियन नेवल शिप्स या शब्दांचे पहिले अक्षर हिंदुस्थानी नौदलातील प्रत्येक युद्धनौकेअगोदर आयएनएस असे संबोधले जाते. उपलब्ध प्रकाशित आकडेवारीनुसार हिंदुस्थानकडे आज 67, 252 सैनिक अधिकारी, 75 हजार राखीव, लहान मोठय़ा 150 युद्धनौका आणि 300 विमाने आहेत. अत्यानुधिक, तंत्रज्ञानाची जोड असलेले हिंदुस्थानचे नौदल असून त्याला गेल्या काही दशकांत स्वदेशी बनावटीची जोड लाभलेली आहे.

नैसर्गिक संकटात हिंदुस्थानी नौदलाचे योगदान

युद्धाच्या परिस्थितीत अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडणाऱया हिंदुस्थानी नौदलाने इतर नैसर्गिक संकटांत केलेले योगदान अतुलनीय असेच आहे. देशातल्या त्सुनामी संकटात नौदलाने ऑपरेशन मदत, सीवेव्हस, कॅस्टर, रेनबो, गंभीर आणि राहत-2 अशा असंख्य मोहिमा पार पाडत हजारो नागरिकांचे जीव वाचवले आहेत. 2018 साली येमेन येथील मेकेनू वादळात हिंदुस्थानी नागरिकांसाठी केलेले मदतकार्य प्रभावी ठरले. केरळ येथे पूरग्रस्त भागात मदत नावाने केलेली मोहीम यासारख्या असंख्य मदतकार्यातून नौदलाने आपल्या नागरिकांचे नैसर्गिक संकटातून प्राण वाचवले आहेत. संकट कुठलेही असो, नैसर्गिक अथवा शत्रू राष्ट्राने निर्माण केलेले अनैसर्गिक हिंदुस्थानी नौदलाने सदैव आपल्या पराक्रमाची, शौर्याची, निष्ठsची शर्थ करत त्यावर मात केली आहे. जगातल्या बलाढय़ नौदलांच्या यादीत 1971 सालानंतर हिंदुस्थानी नौदलाची सन्मानाने गणना होऊ लागली. छत्रपतींचा पगडा असलेली हिंदुस्थानी नौदलाची पताका आपल्या सर्व सामर्थ्याने पाचही तत्त्वांवर डौलाने फडकते आहे. वायूचा वेग, आकाशातील शत्रूला टिपण्याचे सामर्थ्य, क्षेपणास्त्र्ाs, पृथ्वीवरील शत्रूला भेदण्याची अचूकता आणि सागरात देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची अद्भुतता यावर हिंदुस्थानी नौदलाचे अधिराज्य आहे.

[email protected]