माता हारी – बालवाडी शिक्षिका ते गुप्तहेर नृत्यांगना (भाग 1)

  • प्रतीक राजूरकर 

एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी एक सत्यकथा. अनेक रहस्यमय घटना, प्रेम, प्रणय, शृंगार, नृत्य, युध्दाच्या प्रसंग असलेले मार्गरेथा झेल्लेचे आयुष्य. पुढे मार्गरेथा एक मादक नृत्यांगना म्हणून  प्रकाशझोतात आली. तिने माता हरी हे नाव धारण केले होते. कधी जर्मनीची गुप्तहेर म्हणून तर कधी फ्रान्सची गुप्तहेर म्हणून. मूळची डच नागरिक असलेल्या मार्गरेथाचा जन्म 7 ऑगस्ट 1876 साली नेदरलँड येथे एका सुखवस्तू कुटुंबात  झाला. आई वडील तीन लहान भावंड असे हे कुटुंब. वडिलांचे स्वतः चे दुकान. मोठ्या प्रमाणात मार्गरेथाच्या वडिलांनी गुंतवणूक केली होती. सर्व सुखसोयींचा उपभोग घेणारे कुटुंब, मार्गरेथा 13 वर्षांची असतांना अचानक तिचे वडील दिवाळखोर झाले. लहान वयात मार्गरेथाच्या सुखी आयुष्याला कलाटणी मिळाली. माता पित्याचा घटस्फोट झाल्याने कुटुंब विस्कळीत झाले. मार्गरेथा 15 वर्षांची झाली आणि तिच्या आईचे निधन झाले. वडिलांनी लागलीच दुसरे लग्न करून आपल्या अपत्यांना वाऱ्यावर सोडले. मार्गरेथाने बालक मंदिरात शिक्षीकेची नोकरी पत्करली. परंतु तिथल्या मुख्याध्यापकांनी मार्गरेथासोबत लगट करणे सुरू केले. मार्गरेथावर लिहिलेल्या अनेकांनी यात मार्गरेथाचा सहभाग असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे मार्गरेथाला आपली नोकरी गमवावी लागली. तिथून ती आपल्या नातेवाईकांकडे हेग येथे वास्तव्यास गेली. एका अल्पवयीन मुलीचा शिक्षिकेपासून सुरु झालेला प्रवास पुढे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध मादक नृत्यांगना म्हणून ओळख देऊन गेला. इथूनच मार्गरेथाचे गूढ आयुष्य सुरू झाले. पुढे ते अधिकाधिक गुंतागुंतीचे झाले. नृत्यांगना, वेश्याव्यवसाय अशा अनेक वादग्रस्त प्रकरणात मार्गरेथाचे नाव येऊ लागले.

वर्तमानपत्रात त्याकाळी सुद्धा विवाहाच्या जाहिराती प्रकाशित होत असत. डच सैन्यातील एक अधिकारी कॅप्टन रुडॉल्फ मॅकलिओड याच्या विवाहाची जाहीरात बघून मार्गरेथाने रुडाॅल्फला प्रतिसाद दिला. काही लेखकांनी मार्गरेथाच्या नातेवाईकांनी हा विवाह घडवून आणल्याचा उल्लेख केला आहे. 1895 साली मार्गरेथा आणि रुडाॅल्फचा विवाह संपन्न झाला. रुडाॅल्फचे वय 40 तर मार्गरेथाचे वय होते केवळ 18 वर्ष. मार्गरेथाचे सैन्य अधिकाऱ्याची पत्नी म्हणून राहणीमान उंचावले होते. मात्र रुडाॅल्फला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो सतत मार्गरेथाला मारहाण करायचा. मार्गरेथाला या लग्नातून दोन अपत्य झाली. सैन्यातील नौकरीमुळे रुडाॅल्फला आपल्या पत्नी व दोन अपत्यांसमवेत इंडोनेशियाला स्थलांतरित व्हावे लागले. रुडाॅल्फचे मार्गरेथावर शारीरिक अत्याचार वाढतच होते. तिने तात्पुरती रुडाॅल्फ पासून फारकत घेऊन वॅन ऱ्हिडस या डच अधिकाऱ्या समवेत काही काळ वास्तव्य केल्याचा उल्लेख आढळतो. दरम्यान इंडोनेशिया येथे मार्गरेथाने नृत्याचे प्रशिक्षण घेतले व इंडोनेशियाच्या संस्कृती प्रमाणे मार्गरेथाला माता हारी हे मलय भाषेतील नाव मिळाले. पुढे रुडाॅल्फच्या विनंतीवरून मार्गरेथा परत त्याकडे परतली. परंतु रुडाॅल्फच्या वागणुकीत काहीच फरक पडला नव्हता. रुडाॅल्फ हा स्वतः गुप्तरोगी होता. शारीरिक अत्यचारामुळे मार्गरेथाला सिफिलीस नावाचा गुप्तरोग झाल्याचे निदान झाले. त्या रोगाचा दुष्परिणाम संक्रामित होऊन त्यांची दोन्ही अपत्ये गंभीर आजारी पडली. काही लेखकांच्या मते मार्गरेथाच्या अपत्यांवर विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. आजारपणाने मार्गरेथा रुडाॅल्फचा दोन वर्षांचा मुलगा त्यात दगावला. सुदैवाने त्यांची मुलगी आजारपणातून बरी झाली. (मुलगी वयाच्या 21 व्या वर्षी मार्गरेथाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी 1919 साली मरण पावली. तिच्या मृत्यूचे कारण सिफिलीस असण्याची शक्यता काही लेखकांनी वर्तवली आहे. मात्र त्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही)

पॅट शिपमन यांच्या 2007 साली Femme Fatale: Love, Lies, and the Unknown Life of Mata Hari प्रकाशित पुस्तकात असलेली माहिती मार्गरेथच्या आयुष्यावर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. शिवाय मार्गारेथाच्या महत्वाकांक्षा आणि अनैतिक संबंधांवर संशय उत्पन्न करणारी आहे. मार्गरेथाला डच वसाहतीतील सैन्य अधिकाऱ्यांचे उच्च राहणीमान, पदरी असलेले नोकर याबाबत माहिती होती. मार्गरेथने एका मुलाखतीत तिला फुलपाखरासमान सूर्यप्रकाशात बागडण्याची महत्त्वाकांक्षा होती असं सांगितलं होतं. म्हणूनच कदाचित मार्गरेथाने आपल्या पेक्षा 22 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या विवाहोत्सुक अधिकाऱ्याच्या जाहीरातीला प्रतिसाद दिला. रुडाॅल्फला भेटल्यावर सहाव्या दिवशीच मार्गरेथाने लग्नाला होकार दिला. त्यामुळे रुडाॅल्फच्या एकूण स्वभावाचा अंदाज घेण्यास तिला फारसा वेळ मिळाला नाही. मात्र आपल्या महत्त्वाकांक्षा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने होकार दिला असावा असा तर्क निघू शकण्यास वाव मिळतो. डच वसाहतीत वास्तव्यास असतांना मार्गरेथाने अनेकांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. त्यासाठी मार्गरेथाचा स्वभाव व पतीकडून मिळणारी वागणूक कारणीभूत ठरली. डच वसाहतीत असतांना रुडाॅल्फला कमांडर पदावर बढती मिळाली. दोन वर्ष वयाच्या आपल्या मुलाची प्रकृती ढासळल्याने रुडाॅल्फने प्रौढांच्या डाॅक्टरांना पाचारण केले. त्याने दिलेल्या औषधांच्या ओव्हरडोस झाल्याने मार्गरेथाच्या मुलाची प्रकृती अधिकच ढासळली व पुढे त्याचा मृत्यू झाला. याकारणास्तव रुडोल्फची बढती रोखण्यात येऊन त्याची बदली लहान गावात करण्यात आली. सिफिलीस गुप्तरोगाचा त्याकाळी डच वसाहतीतील सैनिकी छावणीत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता. त्यावर फारच मर्यादित उपचार होते ते सुद्धा अगदी प्राथमिक अवस्थेत. अन्यथा अनेकांच्या मृत्यूला आमंत्रण देणारेच ठरले.

मार्गरेथाच्या मुलांवर विषप्रयोग केल्या गेल्याचे The Fatal Lover: Mata Hari and the Myth of Women in Espionage च्या लेखिका जुली व्हीलराईट यांनी लिहिले आहे. परंतु त्याबाबतचे गूढ अद्याप कायम असल्याचे त्यांचा निष्कर्ष आहे. काहींच्या मते मार्गरेथाच्या हितशत्रूंनी हा विषप्रयोग केल्याचे अंदाज वर्तविला आहे. पुढे 1900 साली रुडाॅल्फ सेवा निवृत्त झाल्याने पत्नी मार्गरेथ व मुली समवेत मायदेशी परतला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. 1902 साली मार्गरेथा पती रुडाॅल्फ पासून विभक्त झाली. 1906 साली त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. मुलीचा ताबा मार्गरेथकडे होता. परंतु रुडाॅल्फ मुलीला भेटण्यास आला असता त्याने मुलीचा ताबा मार्गरेथला देण्यास नकार दिला. रुडाॅल्फ कडून आर्थिक पाठबळ मार्गरेथला मिळणे अपेक्षित होते. परंतु पेंशन असूनही रुडाॅल्फने मार्गरेथला मदत केली नाही. मुलीला रुडॉल्फ घेऊन गेल्याने मार्गरेथ कडे कायदेशीर लढाईसाठी पाठबळ नव्हते. त्यामुळे मार्गरेथ आयुष्यात एकटी पडली. 2017 साली मार्गरेथच्या मृत्यूला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त डच प्रकाशक लाॅरेन्स ओल्डर्समाने मार्गरेथाने लिहिलेली काही पत्र प्रकाशित केली आहेत. त्यात मार्गरेथचे हिरावून घेतलेल्या मातृत्वावर प्रकाश पडतो. कौटुंबिक आयुष्यातील नैराश्याने मार्गरेथाला एक वेगळ्या विश्वात कसे ढकलले याचा उलगडा त्या पत्रातून होतो. रुडाॅल्फच्या भावाला मार्गरेथाने लिहिलेली ही पत्र आहेत. त्यात मार्गरेथाने तिच्या आयुष्यातील एकटेपण, पतीचे अत्याचार यामुळे आपल्या पुढील आयुष्यात घडलेल्या घटनांची कारणमीमांसा केल्याचे दिसते.

आयुष्याचा सुरुवातीलाच अगदी लहान वयातच मार्गरेथाने वैयक्तिक आणि कौटुंबिक चढउतार अनुभवले. त्यातून एक चांगले आयुष्य घडवण्यासाठी झालेल्या विवाहातून सुखी होण्याऐवजी तिचा संसार कोलमडून पडला. अनेकदा प्रयत्न करूनही संसार सावरला नाहीच मात्र अधिकच उद्ध्वस्त झाला. या सगळ्यातून पुन्हा उभ राहण्यासाठी मार्गरेथाला नृत्याचे घेतलेले प्रशिक्षण उपयोगी पडले. कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना मार्गरेथाने नृत्याचा पर्याय निवडला. या सोबत इतर अनेक पर्याय सुद्धा जाणते अजाणतेपणाने खुले झालेत. नविन आयुष्याची सुरुवात करतांना मार्गरेथाची माता हारी झाली. आपले सौंदर्य पणास लावण्याचा अखेरचा पर्याय माता हारीला निवडण्यास नियतीने भाग पाडले. पूर्वीच्या आयुष्यापेक्षा माता हारीचे आयुष्य पूर्णतः वेगळे होते. 1905 साली आपल्या मादक नृत्याने व अंगप्रदर्शनाने एका रात्रीत माता हारी प्रकाशझोतात आली. पुढे 1915 साला पर्यंत माता हारीची ओळख उत्तेजक नृत्यांगना म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. पहिल्या महायुद्धात अनेक देश अनावधानाने ओढल्या गेले. मात्र माता हारी व्यक्ती असूनही पहिल्या महायुद्धात ओढली गेली. तिच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या वीस हजार सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप झाला. त्याबाबत ठोस पुरावे नव्हते असे माता हारी समर्थक लेखकांचा दावा आहे. परंतु माता हारी हे व्यक्तिमत्त्व गूढ गुंतागुंतीचे व अधिकाधिक वादग्रस्त होत गेले. त्याबाबत आजही दावे प्रतिदावे केल्या जातात. माता हारीच्या मृत्यू पश्चात शंभर वर्षांनी सुध्दा ते तसेच कायम आहे.

(वरील लेखात परदेशी नावांचे उच्चार प्रत्येक देशाच्या भाषे प्रमाणे वेगळे असू शकतात)

आपली प्रतिक्रिया द्या