पडत्या बाजारातील संधी

>> प्रवीण धोपट

सर्वसामान्य माणसाच्या मनात, स्टॉक मार्केटचा आलेख चढता असेल तर फायदा होतो आणि उतरता असेल तर नुकसान होतं असा सर्वसाधारण समज असतो. या दोन्हीतली कोणतीही कृती कोणत्याही कारणाने जलद होते तेव्हा मार्केट न समजणारे लोक जास्त ऑक्टिव्ह होतात. ते लोक चढत्या बाजारात इन्व्हेस्ट करायला धावतात आणि उतरत्या बाजारात पळून जायची तयारी करतात. याचवेळी मार्केटमधले  जाणकार मात्र याच्या उलट कृती करताना दिसतात. निफ्टी किंवा कोणत्याही शेअरची प्राईस वर जाणे, कमी होणे किंवा काही काळासाठी आहे तिथेच राहणे हा मार्केटचा मूळ स्वभाव आहे. यातली कोणतीही घटना मार्केटच्या परिघात  स्वाभाविक मानली जाते.

गेल्या आठवडय़ात मार्केटने थोडी घसरण पाहिली. त्यानिमित्ताने समाज आणि माध्यमात झालेल्या चर्चाही आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. त्या चर्चेच्या विश्लेषणात न जाता अशा पडझडीतही कोणत्या संधी असतात, हे पाहणं गरजेचं आहे.

जेव्हा मार्केट पडते तेव्हा… !

घाबरून न जाता ही एक सामान्य घटना समजून त्या काळात खरेदीची संधी शोधली पाहिजे. कमी झालेल्या किमतीत शेअर्सची खरेदी केली पाहिजे.

जर तुम्ही आधीच शेअर खरेदी केलेले असतील तर यानिमित्ताने आपला पोर्टपहलिओ रि-इव्हॅल्युएट करण्याची आणि आपल्या चुकांकडे डोळसपणे बघण्याची संधी असते.

कमी झालेल्या किमतीचे शेअर्स खरेदी केल्यास एकूण खरेदीची अॅव्हरेज किंमत कमी होते. संख्येने वाढलेले शेअर्स किमतीनेही वाढल्यानंतर त्याचा इन्व्हेस्टरला फायदाच होतो.

मार्केटमध्ये  शेअर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? असा प्रश्न विचारल्यास त्याचे एकच एक उत्तर देता येत नाही. प्रत्येकाचा शेअर्स खरेदी करण्यामागचा हेतू, जोखीम पत्करण्याची तयारी आणि मार्केटची स्थिती यावर ते अवलंबून असते. तरीही काही पथ्यं पाळून शेअर्स खरेदी करावेत.

ज्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आणि वाढीचा दर स्थिर आहे अशी कंपनी निवडावी.

जेव्हा शेअरची प्राईस आर्ंनग रेशोपेक्षाही कमी असते तेव्हा खरेदी करावी.

जेव्हा मार्केटने तळ गाठलेला असतो किंवा मार्केटमध्ये करेक्शन आलेले असते तेव्हा खरेदी करावी.

आपली रक्कम विखुरलेली म्हणजेच वेगवेगळ्या इंडस्ट्रीत असावी. उदा. आयटी, फार्मा, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी. मार्केटमध्ये केवळ पैशांची गुंतवणूक करून भागत नाही, तर वेळ आणि बुद्धीही खर्च करावी लागते. याचा मेळ ज्याला घालता आला तो शेअर मार्केट समजू शकतो आणि नियमित कमवूही शकतो.

(लेखक दिपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)