उत्तर प्रदेशातील प्रयागराज हायकोर्टात हुंडा प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पतीची पत्नीकडे शरीरसुखाची मागणी रास्त असल्याचे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने मांडले. ‘शारीरिक संबंधावरून पती-पत्नीमधील विवाद म्हणजे हुंडय़ासाठी केलेला छळ समजता येणार नाही. शरीर संबंध पूर्ण करण्याची मागणी पती-पत्नी एकमेकांजवळ करणार नाही तर कुठे करणार? पतीने शरीरसंबंधाची मागणी करणे म्हणजे याला क्रूरता किंवा हुंडय़ासाठी केलेला छळ म्हणता येणार नाही, असे मत प्रयागराज हायकोर्टाने नुकतेच नोंदवले.
प्रकरण हुंडय़ाचे नसून लैंगिक संबंधाचे आहे
नोएडा येथील महिलेने पतीने हुंडय़ासाठी छळल्याचा आरोप करत खटला भरला. हुंडय़ासाठी नवरा रोज मारायचा, त्रास द्यायचा. हुंडय़ाची मागणी पूर्ण झाली नाही की माहेरी पाठवायचा, असे आरोप महिलेने लावले. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाच्या असे निदर्शनास आले की, हे प्रकरण हुंडा छळाचे नसून पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंधावरून वाद आहे. या वादाला वेगळे रूप देऊन हुंडय़ाशी जोडले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्ट म्हणाले, पती पत्नीकडे किंवा पत्नी पतीकडे लैंगिक संबंध पूर्ण करण्याची मागणी करणारच. या मागणीला शारीरिक क्रूरता किंवा हुंडय़ासाठी केलेला छळ म्हणता येणार नाही.