
पालिकेच्या माध्यमातून अखेर पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात झाली आहे. या नालेसफाईच्या कामाची पाहणी संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत करावी आणि कंत्राटदारांनी गाळ काढल्यानंतर त्याची विल्हेवाट 48 तासांत लावावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले. दरवर्षी फेब्रुवारीअखेर सुरू होणारी नालेसफाई यावर्षी रखडल्याने पालिकेवर जोरदार टीका होत होती. मात्र पालिका प्रशासनाने कंत्राटदारांशी समन्वय साधत नालेसफाईला सुरुवात केली. या कामाचे सुयोग्य नियोजन करावे, आवश्यक 14 ठिकाणी ‘ट्रश बूम’चा वापर करावा. रेल्वे प्रशासन व एमएमआरडीए यांच्याशी प्रभावी समन्वय साधावा. पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत व अखंड राहील, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश गगराणी यांनी प्रशासनाला दिले आहेत.



























































