संतापजनक… रायगडावर शिवरायांच्या समाधीस्थळी प्री-वेडिंगचे शूट; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपतींच्या समाधीजवळ तरुण-तरुणीच्या प्री-वेडिंगचे शूटिंग केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या पावित्र्याला धक्का लावाल तर याद राखा. आम्ही ते सहन करणार नाही असा पवित्रा विविध संघटनांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून किल्ल्यांसह विविध ऐतिहासिक स्थळांवर जाऊन प्री-वेडिंग शूटिंगचे स्तोम सुरू झाले आहे. वसईच्या किल्ल्यावरदेखील यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे शूटिंग करण्यात आले. तेथील स्थानिक दुर्गप्रेमींनी कडाडून विरोध केला होता. आता थेट किल्ले रायगडावरच प्री-वेडिंग शूटिंग केल्याचे आढळून आले आहे. रायगडावरील सुरक्षारक्षक तसेच पोलीस यंत्रणा काय करत होती, असा सवाल विचारण्यात येत आहे.

…तर मोठे आंदोलन उभारू

ज्या रायगडावर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी जातात आणि छत्रपतींना मानाचा मुजरा करतात त्या किल्ल्यावर आधुनिकतेच्या नावाखाली प्री-वेडिंगसारखे चोचले यापुढे झाले तर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक जोडपे शिवरायांच्या समाधी परिसरात चित्रीकरण करत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार शिवभक्तांच्या भावना दुखावणारा असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला.

कडक नियमावली करा

किल्ले रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक नियमावली तयार करावी, अशी मागणी अनेक शिवप्रेमींनी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही शुभम कनोजे या शिवभक्ताने केली आहे.